उरण : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अर्थात जेएनपीए मधील स्वतःच्या मालकीचे असलेले जेएनपीसीटी बंदर मंगळवारी जेएम बक्षी पोर्ट्स एंड लॉजिस्टिक लिमिटेड यांना बांधा, वापर आणि हस्तांतरीत करा (पीपीपी) या केंद्र सरकारच्या धोरणानुसार हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे जेएनपीए हे देशातील पहिले खाजगीकरणातून जमीनदार बंदर झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याच बरोबर बंदरातील शॅलो वॉटर बर्थचे अपग्रेडेशन, सुसज्जीकरण आणि ऑपरेशन व देखभाल करण्यासाठी तसेच कोस्टल बर्थ पीपीपी मॉडेल वर चालविण्यासाठी सवलत करारावर स्वाक्षरी केली. शॅलो वॉटर बर्थचे नूतनीकरण आणि कोस्टल यानंतर बर्थचे व्यवस्थापन व संचालन जेएम बक्षी ग्रुपने स्थापन केलेल्या “न्हावा शेवा डिस्ट्रिब्युशन टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड” नावाच्या एसपीव्ही द्वारे केले जाणार आहे.
यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी व उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी जेएम बक्षी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक ध्रुव कृष्ण कोटक आणि जेएनपीएचे सर्व विभागाध्यक्ष होते. शॅलो वॉटर बर्थ आणि कोस्टल बर्थ आता पीपीपी टर्मिनल असतील, यासाठी जेएम बक्षी ग्रुपने यशस्वी बोली लावली होती. सवलतधारकाने हे टर्मिनल अपग्रेड करणे, सुसज्ज करणे, ऑपरेट करणे, देखभाल करणे आणि ३० वर्षांच्या कराराच्या कालावधीच्या शेवटी हस्तांतरित करणे आवश्यक आहे. टर्मिनल ३ वर्षांच्या एकाच टप्प्यात विकसित केले जाईल. जेएनपीए द्वारा पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल. अशी माहिती जेएनपीए चे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली. आज जगातील अनेक प्रमुख बंदरे ही लँडलॉर्ड असून फक्त विपणन कार्य करीत आहेत. जेएनपीए सुद्धा आता अधिक सुव्यवस्थित पद्धतीने विपणन कार्य हाती घेणार आहे, प्राधिकरणाने सामान्य बंदर व्यवसायाचा विकास केला आहे.

हेही वाचा: सावधान! “विजेचे बिल न भरल्याने पुरवठा खंडित करीत आहेत”, फोन आल्यास करु नका आर्थिक व्यवहार

शॅलो वॉटर बर्थची क्षमता ४ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष असून लांबी ४४५ मीटर आहे, त्यापैकी १२५ मीटर रो-रो टर्मिनल म्हणून विकसित करण्यात आले आहे. या बर्थ वर ३०,००० डीटी पर्यंतच्या जहाजांची हाताळणी केली जाऊ शकते ज्यामुळे हा बर्थ किनारपट्टीवरील तसेच परदेशी मालवाहतूकांसाठी सर्वात पसंतीची सुविधा ठरणार आहे. शॅलो वॉटर बर्थ एक मल्टि-कार्गो टर्मिनल आहे जे कंटेनर, सिमेंट, सामान्य मालवाहू आणि द्रव मालवाहू जहाजे परदेशी आणि किनारी दोन्ही हाताळण्यास सक्षम आहे. या बहुउद्देशीय स्वच्छ कार्गो टर्मिनलचा यूएसपी म्हणजे रो-रो जहाजांद्वारे किनारी भागातील कंटेनर जोडण्याची क्षमता, न्हावा शेवाच्या जल-आधारित लॉजिस्टिक इको-सिस्टीममध्ये क्रांती घडवून हे देशातील सर्वात कनेक्टेड हब बनले आहे. या बर्थमुळे देशातील दूरस्थ भागात पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. भारत सरकार किनारपट्टीवरील मालवाहतुक वाढविण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि उद्योगांना हरित पर्याय शोधत आहेत, अशावेळी ही नवीन पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.

हेही वाचा: नवी मुंबई: जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत महापालिकेच्या २३४ शाळा सहभागी

जेएनपीएने किनारपट्टीवरील मालवाहतूकीस चालना एक समर्पित बर्थ प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून कोस्टल बर्थ विकसित केले आहे. किनारपट्टी भागात मालवाहतुकीला चालना देण्यासाठी बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या ‘सागरमाला’ कार्यक्रमांतर्गत या प्रकल्पास अंशतः निधी देण्यात आला होता. कोस्टल बर्थमुळे हरित चॅनेलद्वारे मालवाहतूक सुरळीत आणि जलद होण्यास मदत होईल आणि देशांतर्गत मालवाहतुकीमध्ये किनारी मालवाहतूकीचा वाटा वाढविण्यात मदत होईल आणि तसेच आयात-निर्यात समुदायाची सोय होईल. पोलाद, सिमेंट, कंटेनर, खते, अन्नधान्ये आणि काही इतर स्वच्छ कार्गो यांसारख्या प्रतिवर्षी सुमारे २.४ दशलक्ष मेट्रिक टन कोस्टल कार्गो हाताळण्याची क्षमता कोस्टल बर्थमध्ये आहे. मालाची साठवण आणि हाताळणीसाठी बर्थचे बॅकअप क्षेत्र ९ हेक्टर आहे. प्रकल्पाचा एक भाग म्हणून, जेएम बक्षी सिमेंटच्या साठवणुकीसाठी स्वयंचलित मशीनीकृत सिमेंट हाताळणी प्रणाली आणि कनेक्टेड कन्व्हेइंग आणि सायलो सुविधा प्रदान करेल ज्यामुळे जहाज वाहतूक गतिमान व सुगम होईल. नोव्हेंबर २०२०मध्ये पूर्ण झालेल्या कोस्टल बर्थचे उद्दिष्ट किनार – पट्टीवरील मालवाहतूकीसाठी उत्तम पायाभूत सुविधा प्रदान करणे आणि रेल्वे व रस्ते मार्गावरील वाहतूकीचा भार कमी करणे तसेच किफायतशीर स्पर्धात्मक आणि प्रभावी मल्टी-मॉडल वाहतूक उपाय सुनिश्चित करण्याचा उद्देश आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnpct became the first port in the country to implement the ppp policy navi mumbai tmb 01
Show comments