नोकरभरती व प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्वपक्षीय आंदोलन

जेएनपीटीमधील चौथ्या (सिंगापूर) बंदरातील नोकरभरती तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वात जेएनपीटी बंदर परिसरातील वाहतूक तसेच कामकाज बंद पाडण्यात आले. त्यानंतर जेएनपीटी व्यवस्थापनाकडून येत्या बुधवारी (दि. १०)ला चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

उरण परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र या बंदमधून वगळण्यात आली होती. आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे.

चौथ्या बंदरातील नोकरभरतीत डावलण्यात आलेल्या १७ मुलींना तातडीने नोकरीत सामावून घ्यावे यासह जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या इतर प्रलंबित मागण्यासाठी जेएनपीटी बंदर बंद आंदोलन पुकारण्यात आलेले होते. या बंदमध्ये शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे प्रमुख पक्ष सहभागी झाले होते.

आंदोलनाचे नेतृत्व मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील तर काँग्रेसचे महेंद्र घरत, तसेच जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, रवी पाटील, माजी विश्वस्त भूषण पाटील यांनी केले. यावेळी करळ फाटा, चांदणी चौक, सिंगापूर बंदर मार्ग आदी बंद करण्यात आलेले होते.

तर जेएनपीटीसह इतर खासगी बंदरातील कामगारांच्या पहिल्या पाळीच्या बसला अडवून त्या कामगारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नेत्यांनी केले. बंदमध्ये चार प्रमुख पक्ष सहभागी झालेले असले तरी ज्या संख्येने प्रकल्पग्रस्तांचा सहभाग हवा होता तसा दिसला नाही. तारीख पे तारीख गेल्या अनेक महिन्यांपासून चौथ्या बंदरातील नोकरभरती संदर्भात मोर्चे, धरणे, उपोषण आदी प्रकारची आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळी बैठका घेऊन जेएनपीटीकडून केवळ आश्वासने दिली होती. तीच स्थिती पुन्हा एकदा येणार असल्याने बंद मागे घेतल्याने अनेक प्रकल्पग्रस्तांनी नेत्यांवर नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजीही केली.

* बंद सुरू झाल्यानंतर पोलीस तसेच

नेते व जेएनपीटी व्यवस्थापन यांच्यात चर्चा सुरू करण्यात आली. यामध्ये जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक जयवंत ढवळे यांनी आंदोलन कर्त्यांसमोर येऊन येत्या बुधवारी मागण्यांसंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन देणारे पत्र दिल्यानंतर बंद मागे घेण्यात आला.