जेएनपीटीच्या कामगार वसाहतीची सुरक्षा आणि परिसरातील वाहतूक नियंत्रण करण्याचे काम रायगड सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक करीत आहेत; मात्र या सुरक्षारक्षकांना जेएनपीटीकडून फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे तीन महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. याआधीही अशा प्रकारे वर्षभर या सुरक्षारक्षकांना वेतनाविनाच दिवस काढावे लागले होते. या संदर्भात रायगड सुरक्षारक्षक मंडळाने जेएनपीटीला वेतन करण्याची नोटीस पाठविलेली असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रायगड सुरक्षारक्षक मंडळाच्या माध्यमातून जेएनपीटी कामगार वसाहत आणि जेएनपीटी परिसरातील वाहतूक नियंत्रणाचे काम सुरक्षारक्षक करीत आहेत. एकूण ७१ सुरक्षारक्षक या विभागात काम करीत आहेत. या सुरक्षारक्षकांना खाजगी सुरक्षा एजन्सीमार्फत काम करावे लागत होते. त्यामुळे कमी वेतनात अधिक तास काम करूनही सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे कामगार नेते भूषण पाटील व प्रमोद ठाकूर यांनी रायगड सुरक्षारक्षक मंडळात या सुरक्षारक्षकांची नोंद केली. त्यामुळे सध्या या सुरक्षा रक्षकांना कामगारांना मिळणाऱ्या अनेक सुविधा मिळत आहेत.तसेच वेतनातही वाढ झालेली आहे.मात्र जेएनपीटीने रायगड सुरक्षा मंडळाच्या नेमणुकीला आक्षेप घेतला होता. या संदर्भात राज्य सरकार व न्यायालयाने रायगड सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक नेमावेत, अशी सूचना केली होती. तसेच या सुरक्षारक्षकांना नियमित वेतन देण्याचेही सुचविले असताना वेळेत वेतन दिले जात नसल्याची माहिती प्रमोद ठाकूर यांनी दिली. याची नोंद घेऊन रायगड सुरक्षारक्षक मंडळाचे निरीक्षक मारुती पवार यांनीही जेएनपीटीला वेतन विलंबाचे पत्र दिले आहे.
जेएनपीटीच्या व्यवस्थापक मनीषा जाधव यांच्याशी संपर्क साधला असता वेतनाची प्रक्रिया सुरू असल्याने वेतन देण्यास उशीर झाला असल्याचे सांगून येत्या दोन दिवसांत दोन महिन्याचे वेतन देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.त्यामुळे सुरक्षारक्षकांना वेतन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.उशिरा मिळणाऱ्या वेतनामुळे सुरक्षारक्षकांच्या संघटनेने जेएनपीटी व्यवस्थापना विरोधात गांधीगिरी करून आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे.