जेएनपीटी बंदर परिसरात रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेले भव्य शिल्प उभारण्याचा निर्णय जेएनपीटी विश्वस्त मंडळाच्या गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. जेएनपीटी विभागात दर्शनी भागी या शिल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.त्याकरिता तीनसदस्यीय समितीची घोषणा विश्वस्त मंडळाच्या बैठकीत करण्यात आलेली आहे. या शिल्पामुळे येथील जनतेला प्रेरणा मिळेल, असा विश्वास जेएनपीटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.
जेएनपीटी विश्वस्त मंडळाची बैठक जेएनपीटीचे नवनियुक्त अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली. या बैठकीत जेएनपीटी बंदराच्या परिसरात लौकिक अर्थाने भक्ती आणि शक्तीची प्रतिमा असलेल्या रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त पुतळ्यांची उभारणी करण्याचे ठरविण्यात आले. या शिल्पाची उभारणी करण्यासाठी मंडळाने जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, सुरेश हावरे व जेएनपीटीचे व्यवस्थापक ए.जी.लोखंडे या तीनसदस्यांची समिती स्थापन केली आहे.
या समितीच्या अहवालानंतर शिल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिल्पाची उभारणी केली जाणार आहे. या शिल्पासाठी जेएनपीटीकडून निधी दिला जाणार असून भव्य स्वरूपात भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेले हे शिल्प सर्वाना प्रेरणादायी ठरेल असे मत जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader