औरंगाबाद येथील ४४ शेतकऱ्यांची डाळिंबाची थकीत रक्कम न देणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात एपीएमसी प्रशासनाने जप्तीची कारवाई केली. त्याच्या गाळ्याचा लिलाव करून त्यातून आलेले पैसे सदर शेतकऱ्यांना देण्यात आले.
एपीएमसी फळ बाजारातील व्यापारी सूर्यकांत मनाजी ढोले याने औरंगाबाद येथील एकूण ४४ शेतकऱ्यांची डाळिंबाची रक्कम थकवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी एपीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली होती.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ नुसार शेतमालाची विक्री झाल्यानंतर २४ तासात संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे बंधनकारक आहे. असे असताना फळ बाजारातील गाळा क्र. ८६५ मधील व्यापारी सूर्यकांत याने औरंगाबाद येथील ४४ शेतकऱ्यांच्या डाळिंब या मालाची ५८ लाख २९ हजार ७३९ रुपये रक्कम दिली नव्हती. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी एपीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली होती. एपीएमसीने शहानिशा करून त्या व्यापाऱ्याला नोटीस काढली. मात्र त्याने नोटिसीकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे एपीएमसीने गाळ्यावर जप्तीची कारवाई केली. तसेच गाळ्याचा लिलाव करून विक्रीमधून आलेली ४१ लाख १ हजार १११ रुपये रक्कम शेतकऱ्यांना समप्रमाणात देण्यात आली. यावेळी एपीएमसीचे प्रशासक सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण यांनी शेतकरी लळाजी मते, भाऊसाहेब मते, भीमराव चौधरी, सोमनाथ ससेमहाल यांना धनादेश देऊन थकीत रक्कम दिली.