पोलीस म्हटलं की कारवाई आलीच; परंतु पोलिसांचे मित्र हे एक रूप नेहमीच अदृश्य राहात आले आहे. त्याला मूर्तरूप देण्याचे काम कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे करीत आहेत. यासाठी त्यांनी रोज सायंकाळी किमान चार किलोमीटर पायी चालून प्रत्येकाशी संवाद साधण्याचा उपक्रम आरंभला आहे.
पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही दिवसांतच पोपेरे यांच्या उपक्रमाला तितकाच चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी कळंबोली वसाहतीमध्ये बाजीराव मोहिते यांच्या बदलीनंतर पोपेरे यांची नेमणूक केली.
बेलापूर वाहतूक विभाग आणि त्याआधी नाशिक जिल्ह्य़ातील मोठी लोकवस्ती असलेल्या पोलीस ठाण्यांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळल्यानंतर त्यांच्याकडे कळंबोलीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पोपेरे यांनी पोलिसांच्या खाकी वर्दीतील माणसाची ओळख नागरिकांना व्हावी आणि त्यांच्या मनात पोलिसांविषयी विश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने ही संवाद मोहीम सुरू केली आहे. अद्याप याची सवय नागरिकांना झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटतात. परंतु हळूहळू त्यांना त्याची सवय होईल, असे मत पोपेरे यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले. पोपेरे यांच्यासोबत पोलिसांची एक गाडी असते. याशिवाय अन्य पोलीस कर्मचारी असतात. सध्या वसाहतीत रस्त्याकडेला बसणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये पोपेरे यांच्याविषयी चर्चा आहे. रस्त्याने भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्यांना आणि सोनसाखळी चोरांना कसे नियंत्रणात आणता येईल, यावर सध्या नागरिकांशी चर्चा सुरू असल्याचे पोपेरे म्हणाले.
या उपक्रमात पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनीही सकाळी सेक्टर १ येथील रस्त्यावर साध्या वेशात सामान्यांसोबत फिरण्यास सुरुवात केली आहे. पोलीस असल्याची बतावणी करून चोरीच्या अनेक घटना वसाहतीत घडल्या आहेत. पोपेरे यांच्या या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धतीचा प्रभाव इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर पडला आहे. कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी मुटकुळे यांनीही वसाहतीत फिरण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Story img Loader