कळंबोलीत वाहतूक पोलिसांकडूनच नियमांची पायमल्ली
कार चालवताना ‘सीटबेल्ट’ न लावणाऱ्या चालकांवर कळंबोलीत वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यांचे वाहन परवाने तीन महिन्यांसाठी काढून घेण्यात येत आहेत; परंतु या कारवाईला कायद्याचेच पाठबळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिवहन विभागाच्या नव्या परिपत्रकात ‘सीटबेल्ट’ न लावणाऱ्यावर कारवाई करून त्याचे समुदेशन करावे, असे नमूद असताना चालकांवर थेट परवाना निलंबनाची कारवाई पोलीस करीत आहेत. त्यामुळे नियमांची पायमल्ली पोलिसांकडूनच केली जात असल्याचे बोलले जात आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावावर पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यानुसार ३४ दिवसांत २०० जणांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केल्याची माहिती उजेडात आली आहे. यात ‘सीटबेल्ट’ न लावणाऱ्या चालकांची संख्या जास्त आहे.
नव्या परिपत्रकानुसार १ जानेवारीपासून मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे, क्षमेतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, माल वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, सिग्नल तोडणे, दारू पिऊन वा मद्यपान करून वाहन चालवणे, अशा नियमांचा समावेश आहे. यात वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद आहे; मात्र सरकारच्या नियमाला फाटा देत मार्चपर्यंत कारवाईतील चालकांचा आकडा फुगवण्यासाठी ‘सीटबेल्ट’ न लावणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित करण्याची सरसकट कारवाई कळंबोली सर्कल येथे वाहतूक पोलीस करीत आहेत.
महिनाभरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या १३५ जणांच्या परवान्यांच्या निलंबनाचे प्रादेशिक विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले. यामध्ये सीटबेल्ट न लावता वाहन चालविणाऱ्यांचा समावेश आहे. आदेशात विनाहेल्मेट दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना दंड, तसेच त्यांचे समुपदेशन करणे असा नवा नियम आहे. अशाच पद्धतीने सीटबेल्ट न लावता वाहन चालविणाऱ्यांनाही दंडात्मक कारवाईची तडजोड करून चालकाचे समुपदेशन केंद्रात प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे नवीन परिपत्रकात म्हटले आहे.
कळंबोली वाहतूक विभागाच्या पोलिसांनी ५५ जणांना परिवहन विभागाच्या नवीन नियमानुसार कारवाई केली आहे. या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख पाटील यांनी परिवहन विभागाच्या नवीन परिपत्रकानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगून सीटबेल्ट न लावणाऱ्या चालकांचा परवाना निलंबित करण्यासाठीचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविल्याची माहिती दिली आहे. पाटील यांनी नवी मुंबईच्या वाशी वाहतूक विभागाने याच पद्धतीने सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहन चालकांविरोधात परवाना निलंबित करण्याची कारवाई सुरू असल्याची पुस्ती जोडली आहे. परंतु वाशी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सीटबेल्ट न लावणाऱ्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
दोन तास समुपदेशनाचा प्रयोग
सीटबेल्ट न लावता कार चालविणे आणि हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांचे दोन तास समुपदेशन करणे सक्तीचे आहे. मात्र नवी मुंबईमधील १६ वाहतूक पोलीस ठाण्यांच्या इमारतींसाठी हक्काची जागा नाही. अशा वेळी समुपदेशन करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा