कळंबोलीत गेल्या १५ दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून त्याचा जाब विचारण्यासाठी येथील संतप्त महिलांनी शुक्रवारी सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
सिडको प्रशासन स्मार्ट सिटीच्या धरतीवर सिडको वसाहती वसविण्याच्या गाजावाजा करताना कळंबोली या २० वर्षांपूर्वी वसविलेल्या वसाहतीत अजूनही पाणीटंचाई समस्या भेडसावत आहे. कळंबोलीतील सेक्टर-३ येथील एलआयजी या बैठय़ा वसाहतीमध्ये गणेशोत्सवापासून पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. नवरात्रोस्तवापासून या गृहिणींच्या घरात जे काही अल्प प्रमाणात येणारे पाणी होते तेही आता बंद झाले आहे. पाण्यासाठी रहिवाशांना वणवण भटकावे लागते आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही परिस्थिती निर्माण झाली असून महिलांना अधिक प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलत नसल्याचे पाहून काही दिवसांपूर्वी संतप्त महिलांनी सिडकोचे बेलापूर येथील पाणीपुरवठा कार्यालय गाठले आणि तेथील अधिकाऱ्याला जाब विचारला असता तेथील अधिकाऱ्याने मी येथे नवीन आहे, असे सांगून बचावात्मक पवित्रा घेत आठ दिवसांत काम करतो असे आश्वासन दिले. त्यानंतर महिला शांत झाल्या, परंतु आठ दिवसांत परिस्थिती ‘जैसे थे’ राहिल्यानंतर महिलांच्या संतापात अधिक भर पडली. त्यांनी डोक्यावर हंडे घेऊन गावचे सरपंच विजय खानवकर आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सिडकोचे कळंबोली येथील कार्यालय गाठले. तेथील प्रशासकीय अधिकारी किरण फणसे यांनी तो माझा विभाग नसल्याचे थातुरमातुर उत्तर देऊन पळवाट काढण्याचा प्रयत्न केला, परंतु फणसे यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिल्यानंतर नमते घेत फणसे यांनी मोर्चेकरी महिला आणि रहिवाशांचे म्हणणे ऐकण्यास भाग पडले. अखेर फणसे यांनी सोमवापर्यंत सिडको पाणीपुरवठा सुरळीत करेल, असे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाण्यासाठी कोंढाणे धरण घेऊ आणि सिडको वसाहतींची तहान भागवू, असे आश्वासन दिले होते. रहिवासी ती मुलाखत प्रसिद्ध झालेले वर्तमानपत्र घेऊन भाटिया यांची आठवण करून देण्यासाठी येथे आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा