सिडको महामंडळाकडून पाणी पुरवठा सूरळीत होत नसल्याने कामोठे वसाहतीमधील सेक्टर ३६ येथील सत्यकुंज गृहनिर्माण संस्थेच्या सदनिकाधारकांनी गुरुवारी दुपारपासून सिडकोच्या पाणी पुरवठा कार्यालयात ठिय्या मांडला. ३० सप्टेंबरला पाणी समस्या घेऊन हे रहिवाशी याच कार्यालयात आले होते. त्यांना सिडकोच्या अधिका-यांना लवकरच उपाययोजना करतो असे आश्वासन दिले होते मात्र कोणतीही कार्यवाही न केल्याने वैतागलेल्या रहिवाशांनी गुरुवारी सिडकोचे कार्यालय गाठून जोपर्यंत कार्यवाही नाही तोपर्यंत घरी जाणार नाही अशी भूमिका घेतली.सत्यकुंज सोसायटीमध्ये २३१ सदनिका आणि २० गाळे धारक आहेत.

अवघे १५ ते २० मिनिटेच पाणी प्रत्येक सदनिकेला मिळत आहे. तीस-या व चौथ्या मजल्यावरील रहिवाशांचे यामुळे पाण्याविना हाल होत आहेत. सरकारच्या नियमानूसार प्रत्येक सदनिकेला प्रतीदिन ६७५ लीटर पाणी पुरवठा करणे अत्यावश्यक असूनही हा पाणी पुरवठा होत नसल्याने लाखो रुपये किमतीने खरेदी केलेल्या सदनिकेत कसे रहावे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. दररोज १५६ ते १६० युनिट पाणी पुरवठा अपेक्षित असताना ३ व ४ अॉक्टोबरला ५० व ३८ युनिट प्रत्येकी पाणी पुरवठा झाल्याने गुरुवारी संतप्त रहिवाशांनी थेट सिडकोचे कार्यालय गाठले. अधिका-यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने महिलांनी दुपारपर्यंत सिडकोच्या पाणी पुरवठ्याच्या कार्यालयात ठिय्या मांडून अगोदर पाणी द्या नंतरच अधिका-यांना घरी जाऊ देऊ अशी भूमिका घेतली.

Story img Loader