कामोठे येथे साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पथकाने तब्बल तीन लाख रुपये किमतीचा गुटखा व दोन मारुती गाडय़ा गुरुवारी जप्त केल्या. कर्नाटक व आंध्रप्रदेश येथून हा गुटखा येथे आणून नवी मुंबई व मुंबईत तो पुरवला जातो, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पहाटे सहा वाजता गुटखा वाहून नेणाऱ्या या वाहनांना कामोठे येथे ताब्यात घेण्यात आले. या गाडय़ांच्या डिकीमध्ये गुटखा आढळून आला. या वेळी गुटख्याच्या १५ गोण्या जप्त करण्यात आल्या. पथकाने अतिशय गुप्तपणे ही कारवाई केली.

एका पुडीच्या विक्रीमागे पानटपरीचालकाला दहा रुपये मिळत असल्याने पानटपरीचालकांचा गुटखाविक्रीकडे कल आहे. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय गुटख्याचा काळाबाजार चालणे शक्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कामोठे येथे तीन दिवसांपूर्वी गुटखा विकणाऱ्या टपरीचालकाला पोलिसांनी अटक केली होती. त्या वेळी पोलिसांचे अंतर्गत कलह उघड झाले होते. त्याच टपरीचालकाने गुटख्याची ही पोलखोल केल्याचे बोलले जात आहे.  अनेक आरोपी हे मुंबई परिसरातील असल्याने पोलिसांनी त्यांची नावे उघड करण्यास नकार दिला.

Story img Loader