उरण : जेएनपीएच्या चौथ्या(सिंगापूर) बंदरासाठी करळ ते जसखार मार्गाला जोडणाऱ्या स्वतंत्र उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल ऑगस्ट पासून कंटेनर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. करळ बहुमार्गी उड्डाणपूल ते जसखार असा ७०० मीटर लांबीचा दुपदरी उड्डाणपूल ६८ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. यामुळे करळ ते जसखार उड्डाणपुलामार्गे होणारी कंटेनर वाहतुकीची वर्दळ आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
जेएनपीए मध्ये सिंगापूर पोर्ट (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) हे खासगीकरणाच्या माध्यमातून दोन हजार मीटर लांबीचे चौथे बंदर उभारण्यात येत आहे. ८ हजार कोटी रुपये खर्चाच्या या चौथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे.तर दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे.या बंदरातुन वर्षाकाठी ५० लाख कंटेनर वाहतूक करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी चौथ्या बंदराशी जोडणाऱ्या स्वतंत्र मार्गाच्या उभारण्याचे काम जेएनपीएने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एन एच आय) कंपनीला दिले होते. या पुलाचे उर्वरित काम दिवसात पुर्ण होणार आहे. त्यानंतर उड्डाणपूल जेएनपीएकडे सुपुर्द करण्यात येणार असून तो वाहतूकीसाठी कधी खुला करावा याचा निर्णय जेएनपीए प्रशासन घेईल अशी माहिती एनएचआयएचे सह व्यवस्थापक यशवंत घोटकर यांनी दिली.