उरण : मुंबईतील ब्रिटिशकालीन ससून व भाऊचा धक्का बंदरात उतरविण्यात येणारी मासळी आता करंजा येथे उरणच्या करंजा बंदरात खरेदी-विक्री सुरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी उरणचे आ. महेश बालदी यांच्या हस्ते काट्याचे पूजन करून ही सुरुवात करण्यात आली. या वेळी स्थानिक मच्छीमारांनी आनंद व्यक्त केला. त्यामुळे ग्राहकांना घाऊक व स्वस्त मासळी मिळण्याचे मुंबईऐवजी नवीन ठिकाण उपलब्ध झाले आहे.

मासळी खरेदी करायची असेल तर उरणच्या करंजा बंदरात या, असे आवाहन येथील मच्छीमार संस्था आणि मच्छीमारांनी केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या १५० कोटी रुपयांच्या भागीदारीतून करंजा येथे एकाच वेळी ७५० मासेमारी बोटी उभ्या करून मासळीची खरेदी-विक्री करण्याची व्यवस्था असलेले करंजा बंदर सुरू झाले आहे.

हेही वाचा…केंद्रीय अतिक्रमण दक्षता पथक स्थापन, नवी मुंबईतील अतिक्रमणांवरील कारवाईतील टाळाटाळ रोखली जाणार

नव्या हंगामामुळे नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी करणाऱ्या बोटी दररोज येऊ लागतील. त्यामुळे या बंदरातील मासेमारी करणारा व्यावसायिक सध्या सुखावला आहे. बालदी यांनी करंजा बंदराच्या उर्वरित कामांसाठी १५४ कोटींचा निधी लवकरच मंजूर होईल आणि त्यानंतर बंदराचे काम पूर्ण करण्यात येईल. मात्र त्यापूर्वी मासळी खरेदी-विक्रीसाठी मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे तात्पुरती व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. या बंदरामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे. भविष्यात करंजा हे बंदर करंजा-रेवस सागरी पुलामुळे मुंबईला सर्वात जवळचे बंदर ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील ससून डॉकमध्ये मासळीचा व्यवहार करणे जिकिरीचे झाले होते. त्या ठिकाणी वाढत्या गर्दीमुळे मासेमारांना दूरवरच्या कसारा बंदरात जाऊन मासळीची विक्री करावी लागत होती. आता ही सुविधा करंजा बंदरातच उपलब्ध झाल्याने रोजगार आणि मासळी विक्रीची सोय होणार आहे. – प्रदीप नाखवा, अध्यक्ष, करंजा मच्छीमार संस्था

हेही वाचा…पनवेल: जलवाहिन्यांवर बूस्टरपंप बसविल्यास गृहनिर्माण संस्थेवर सिडको कारवाई करणार

करंजा बंदर सुरू झाले असून येथील तरुण मच्छीमार स्वत: मासळी निर्यात व्यवसाय करू लागला आहे. त्याचप्रमाणे या बंदरामुळे स्थानिकांना विविध प्रकारचे व्यवसायही उपलब्ध होणार आहेत. – गणेश नाखवा, युवा मच्छीमार नेते