उरण : करंजा कोकणातील मच्छीमारांना वरदान ठरणाऱ्या करंजा बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र बंदरातील सुविधांसाठी दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर पुढील काम सुरू होणार आहे.

मुंबईतील ससून बंदराला पर्याय म्हणून हे नवीन बंदर केंद्र व राज्य सरकारच्या भागीदारीतून उभारले जात आहे. मात्र मागील अकरा वर्षांपासून या बंदराचे काम अत्यंत धिम्या गतीने रखडत रखडत सुरू आहे. केंद्र-राज्य सरकारच्या निम्या निम्या भागीदारीच्या फॉर्म्युल्यावर सुरू असलेल्या बंदराचे काम अपुऱ्या निधीअभावी अपूर्ण राहिले आहे. २०१२ साली करंजा बंदराचे काम सुरू करण्यात आले. हे काम ६४ कोटींवरून १५० कोटींपर्यंत पोहोचले आहे. अतिरिक्त खर्चाचा निधी शासनाकडून वेळेत उपलब्ध होऊ शकला नाही. बंदरात साचलेला गाळ काढणे, स्वच्छतागृह उभारणे, बंदराशी जोडणाऱ्या रस्त्यांची कामे अद्यापही झालेली नाहीत. त्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने अधिकचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. या मासेमारी बंदरामुळे परिसरातील २५ हजार नागरिक, व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मच्छीमारांचेही भाग्य उजळणार असल्याने या बंदराची तयार होण्याची प्रतीक्षा आहे. करंजा मच्छीमार बंदर हे रायगड आणि कोकणातील मच्छीमारांना फायद्याचे ठरणार आहे. येथील मच्छीमारांना आपल्या मासळीची विक्री करण्यासाठी दूरच्या बंदरात जाण्याची गरज लागणार नाही.

हेही वाचा – तळोजात पालिकेचा दवाखाना लवकरच, पनवेल पालिका आरोग्य विभागाची माहिती

हेही वाचा – खोपटे अपघात प्रकरण : एनएमएमटी श्रमिक सेनेनेकडून काम बंद आदोलन, जुईनगर-कोप्रोली मार्गावरील बस बंद

बंदर मराठी माणसांच्या हाती राहणार का?

मुंबईतील ससून आणि आता रायगड जिल्ह्यातील मच्छीमार बंदरावर परप्रांतीयांचा ताबा होऊ लागला आहे. याविरोधात स्थानिक मच्छीमार आक्रमक झाले आहेत. त्यामुळे करंजा येथे उभारण्यात येणारे बंदर तरी स्थानिक आणि मराठी माणसांच्या हाती राहणार का, असा सवाल आता येथील मच्छीमारांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Story img Loader