उरण : अनेक महिने नादुरुस्त असलेल्या करंजा उरण मार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील प्रवासी आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र या मार्गाच्या कामाचा दर्जा नियमानुसार ठेवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. निधी मंजूर होऊनही काम सुरू होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. अखेरीस या मार्गाचे काम सुरू झाले आहे.
उरण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि देशातील मोठे मच्छीमार बंदराला जोडणाऱ्या उरण ते करंजा मार्गाची दुरवस्था झाली होती. याचा संताप व्यक्त करणारी चित्रफीतही समाजमाध्यमातून प्रसिद्ध झाली होती. यातून या मार्गावरून प्रवास केल्यास आपला किडनी स्टोन सारखा आजार मोफत बरा होईल असा उपहासात्मक संताप यातून व्यक्त केला गेला होता. या मार्गावरील प्रचंड खड्ड्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे हजारो नागरिक व व्यवसायिक त्रस्त झाले आहेत. मात्र आता या मार्गाच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली होती. दरम्यान, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
चौकट
कामाच्या दर्जाबाबत शंका
या मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र कोणत्याही प्रकारची खोदाई न करता केवळ डांबराचा थर टाकण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या कामाला करंजा जेट्टीवरून सुरुवात झाली आहे. एका दिवसातच डांबरीचा उखडू लागला आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाची तक्रार आपण केली असल्याची माहिती करंजा येथील सामाजिक कार्यकर्ते मुकेश थळी यांनी दिली.