उरण : करंजा (उरण) ते रेवस (अलिबाग) या बहुप्रतीक्षित सागरी पुलाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. गुरुवारी एमएसआरडी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांनी तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांच्या १९८० च्या आराखड्यानुसार मार्गिका द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ(एमएसआरडीसी) च्या माध्यमातून नव्याने हा मार्ग उभारण्यात येत आहे. प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. याची दखल घेत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. उरणच्या करंजा ते अलिबाग येथील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे भूमिपूजन १४ ऑक्टोबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. २ हजार ४७८ कोटी रुपयांची निविदा या पुलाच्या उभारणीसाठी मागविण्यात आली आहे. या पुलाची एकूण लांबी ही १०.२०९ किलोमीटर आहे. मुंबईतील सागरी अटल सेतू मार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात हा प्रवास करता येणार आहे. नियोजित रेड्डी ते रेवस मार्गापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने १९८० साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अ.र अंतुले यांनी करंजा ते रेवस मार्गाची घोषणा केली होती. यावेळी भूसंपादनाची प्रकिया राबवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव सत्ताबदल होऊन अंतुले यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या पुलाचे काम बंद झाले होते.
हेही वाचा…भाजीपाल्याची आवक वाढली, वातावरणातील उष्म्याने आठ दिवस आधीच उत्पादन
४२ वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्याने सरकारने एमएसआरडीसीकडून हा मार्ग तयार केला जात आहे. त्यासाठी या मार्गावर करंजा ते रेवस हा सागरी पूल उभारला जाणार आहे. या पुलाला जोडणाऱ्या मार्गासाठी करंजा येथील चाणजे महसूल हद्दीतील जमीन संपादित करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १९८० च्या नियोजित मार्गात बदल करून ऐतिहासिक व पौराणिक रामायणातील उल्लेख असलेल्या द्रोणगिरी पर्वताच्या पायथ्याला लागून हा रस्ता बनवण्याचा घाट घातला जात आहे. त्याला येथील ग्रामस्थांचा आक्षेप घेतला आहे. तसेच या मार्गाच्या खोदकामामुळे द्रोणगिरी पर्वताला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘विकासाला विरोध नाही. मात्र शासनाने करंजा रेवस सागरी पुलाला जोडणारी मार्गिका जुन्या आराखड्या प्रमाणे करावी,’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर व उरण पंचायत समितीचे माजी सभापती सागर कडू यांनी केली आहे. यावेळी चाणजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे,देविदास थळी यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा…धूळधाण पुनर्विकास इमारतींमुळे ऐन थंडीतही शहरात धुळीचे साम्राज्य
एम एस आर डी सी ने तयार केलेल्या आराखड्या नुसार शेतकऱ्यांना करंजा रेवस पुलाला जोडणाऱ्या मार्गिकेचे पॉईंट दाखविण्यात येत आहेत. जेणेकरून त्यांना कल्पना येईल. अनिरुद्ध बोर्डे, अभियंता एमएमआरडीसी .