स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही करंजा ग्रामस्थांना २८ दिवसातून एकदा तासभर पाणी येत आहे. याविरोधात सात पाड्यातील ग्रामस्थ एकवटले आहेत. एकच मागणी, हवे पिण्याचे पाणी असा एल्गार करीत बुधवारी १ मार्चला उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय रविवारी कोंढरी येथील हनुमान मंदीरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
हेही वाचा- महाराष्ट्राच्या राज्यगीताचे अभिमानाने समूह गायन; नवी मुंबई शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
अनेक वर्षांपासून करंजा येथील ३० हजाराच्या लोकवस्तीच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढतच चालली आहे. १५ दिवसातून एकदा तासभर येणारे पाणी २१ दिवसावरून आता २८ दिवसांवर पोहचली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासन, एमआयडीसी,लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात असंतोष पसरला आहे.त्यातच येथील अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्याचा फटका द्रोणागिरी हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना बसत आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : उरणच्या चिट फंड घोटाळ्यातील आरोपीला अटक; १० कोटींची रोख रक्कम जप्त
उरण तालुक्यातील सर्वात मोठ्या चाणजे ग्रामपंचायतीत अनेक दशकापासून करंजा सात पाड्यात अनियमित पाणी पुरवठ्याची समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद,राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून करंजा परिसरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. असे असतांना ही करंजा येथील अनियमित व अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. यामध्ये ग्रामस्थांच्या पर्यंत पाणीच पोहचत नाही. ते मध्येच फस्त होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या गावांना एमआयडीसीच्या रानसई धरणातून व नवी मुंबईच्या हेटवणे धरणातून आशा दोन योजनांतून पाणी पुरवठा केला जात आहे. तरीही पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना पाण्यामुळे होणाऱ्या अनेक साथीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या ग्रामस्थांच्या बैठकीला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हेही वाचा- नवी मुंबईतील इ-टॉयलेट संकल्पना अयशस्वी, पारंपरिक शौचालय बांधण्याचा निर्णय
यावेळी कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,महिला नेत्या हेमलता पाटील,कुसुम ठाकूर,माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा,करंजा मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, चाणजे ग्राम पंचायत सदस्य रवी कोळी. करंजा सोसायटीचे सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्या, कमला म्हात्रे.देविदास थळी, समर्थ महिला मंडळ अध्यक्षा सरस्वती कोळी, महालक्ष्मी महिला बचत गट अध्यक्षा, राजश्री नाखवा.आगरी कोंढरीचे माजी अध्यक्ष अमृत म्हात्रे आदीजण उपस्थित होते.