लोकसत्ता प्रतिनिधी
उरण : सोमवारी करंजा येथील पाणीटंचाईवर उरणचे तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. या वेळी झालेल्या चर्चेत मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी द्रोणागिरी नोडमधील सेक्टर ५३ च्या जोडणीला बूस्टर लावून करंजातील कासवले व कोंढरी या गावांना पाणीपुरवठा सुरू केला जाईल. तर जलजीवन मिशनची उरण चारफाटा ते करंजा या जलवाहिनीचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करून थेट करंजा येथे पाणी पोहोचविणे असे दोन पर्याय सुचविण्यात आले आहेत. या सकारात्मक चर्चेमुळे पुन्हा एकदा करंजा पाणीप्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.
उरणच्या तहसील कार्यालयावर सोमवारी नागरिकांनी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र चर्चेसाठी आमंत्रण आल्याने दुपारी कार्यालयात झालेल्या चर्चेनुसार समान पाणीवाटप करण्यासाठी एक दिवस करंजा गाव व दुसऱ्या दिवशी इतर विभाग यांना पाणीवाटप करण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील. द्रोणागिरी बाजूने पाणीपुरवठा करण्यासाठी बूस्टर पंप बसवून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल, सिडकोकडून जादा पाणी सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करून त्यांची भेट घेऊन प्रयत्न करण्यात येतील.एमआयडीसीकडून पाणी बिल थकबाकी भरल्यास जादा पाणी सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-नवी मुंबई देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरेल?
करंजा पाणीप्रश्नावर उपाय म्हणून द्रोणागिरीमधून बूस्टर बसवून दररोज दीड ते दोन लाख लिटर पाणी घेण्याची योजना आहे. जलजीवन योजनेच्या वाहिनीचे काम पूर्ण करीत कॉक लावून एमआयडीसीच्या वाहिनीने थेट करंजाला पाणीपुरवठा करणे या दोन उपाययोजना करण्यात येणार आहेत. -समीर वठारकर, गटविकास अधिकारी, उरण