कोकणातील हापूस आंब्यावर पडणारी रोगराई, दिवसागणिक बदलणारे हवामान, कमी उत्पादनाचा फटका, खतांच्या वाढलेल्या किमती, मजुरांची वानवा यांसारख्या संकटांचा कोकणातील हापूस आंबा बागायतदार निमूटपणे सामना करीत असतानाच आता शेजारच्या कर्नाटक, केरळ राज्यातील हुबेहूब हापूस आंब्यांची टक्कर द्यावी लागत असून फळबाजारात या आंब्यांनी पिंगा घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा इतर फळ उत्पादनाप्रमाणेच आंबा बागायतदारांवर खर्चाची तोंडमिळवणी करता करता नाकीनऊ आले असून कर्नाटकी हापूस आंब्याने बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केली आहे. तुर्भे येथील फळ घाऊक बाजारात सध्या येणाऱ्या एकूण चाळीस हजार हापूस आंब्यांच्या पेटय़ापैकी पंधरा हजार हापूस आंब्याच्या पेटय़ा ह्य़ा केवळ कर्नाटक केरळमधील आहेत. विशेष म्हणजे हे आंबेदेखील कोकणातील हापूस आंब्यासारखे दिसत असून किरकोळ विक्रेते ‘कोकण का हापूस’ म्हणूनच विकत आहेत. त्यामुळे बागायतदार व व्यापाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.
कोकणातील हापूस आंब्यांची आवक आता वाढू लागली असून गुढीपाडव्यानंतर तर ही आवक आणखी वाढणार आहे. घाऊक बाजारात आंबे पाठवून वर्षांच्या जमाखर्चाची गोळाबेरीज करणाऱ्या कोकणातील बागायतदारांच्या आंब्याला सध्या कमी उठाव असल्याचे दिसून येऊ लागले आहे. कोकणातील हापूस आंब्यासोबतच फळबाजारात येणाऱ्या कर्नाटक राज्यातील हुबळी, धारवाढ, शिमुगा, भद्रवती, रामनगर आणि गुंटुर भागातील हापूस आंब्यांना चांगलीच मागणी आहे तर केरळ राज्यातील कोचिन बाजारपेठेतील हापूस आंबेदेखील एपीएमसीत डेरेदाखल झाले आहेत. स्वस्त आणि मस्त वाटणारा हा हापूस आंबा कोकणातील हापूस आंब्यासारखाच दिसत असून उत्तर भारतीय, बिहारी, आणि पश्चिम बंगाली किरकोळ विक्रेते ह्य़ा हापूस आंब्याला जास्त पंसती देत आहेत. त्यात निर्यात करणाऱ्या निर्यातदारांनीदेखील कर्नाटकी आंबा दुबईत पाठविण्यास सुरुवात केली आहे. तीनशे ते साडेतीनशे प्रतिडझन असलेला हा आंबा जास्त विकला जात असून कोकणातील चांगल्या प्रतीच्या हापूस आंब्याची या पेक्षा दुप्पट दर असल्याने किरकोळ विक्रेते त्याला हात लावेनासे झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी कर्नाटकमधून आलेल्या या आंब्याच्या पंधरा हजार पेटय़ा हातोहात संपल्याचे व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले.

कर्नाटक, केरळ राज्य कोकणातील हापूस आंब्याची नक्कल मारू शकतात, पण गुणवत्ता, चव, रंग यांची तुलना ते देवगडमधील हापूस आंब्याबरोबर करू शकणार नाहीत. तशी नैर्सगिक स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली नाही. त्यामुळे कोकणातील हापूस हा खरा हापूस असून केवळ हापूस नाव दिल्याने खव्वयांना तो आनंद मिळणार नाही. त्यासाठी कोकणातील हापूस महाग असला तरी घेणारे ग्राहक आहेत. आंब्यामध्ये कोकणातील हापूस हा एक ब्रॅन्ड आहे. त्यामुळे ग्राहक त्यात तडजोड करणार नाहीत असा विश्वास आहे. आंबा विक्रीवर केरळ, कर्नाटक आंब्याचा कोकणातील बागायतदारांवर परिणाम होत आहे, पण स्पर्धेत आम्ही टिकून राहणार आहोत.
-प्रसन्ना पेठे, आंबा बागायतदार, रत्नागिरी.