घाऊक बाजाराबाहेर किरकोळ विक्रेत्यांकडून फसवणूक

हापूसबरोबर इतर आंब्यांचाही हंगाम सुरू झाला असून एपीएमसी फळ बाजाराबाहेर मात्र किरकोळ विक्रेते विविध प्रकारे शक्कल लढवून हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकत आहेत. पेटीत वरच्या भागात हापूस आणि खाली कर्नाटकी आंबे ठेवून फसवणूक केली जात आहे.

वाशी बाजारात सध्या मोठय़ा प्रमाणात कोकणामधील हापूस  दाखल होत असून त्याच बरोबर कर्नाटकी आंब्याची देखील आवक होत आहे. यंदा हवामान बदलाने हापूसच्या उत्पादनात तर घट झालीच आहे, मात्र त्याच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. याचा फायदा घेत किरकोळ विक्रेते हापूस असल्याचे सांगून कर्नाटकी आंबा विकत आहेत. एपीएमसीबाहेर पदपथावर बसणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याने हे किरकोळ विक्रेते इतर लहान विक्रेत्यांना हाताशी धरून फिरतीवर आंबा विकत आहेत.

किरकोळ विक्रेते आणि इतर फेरीवाल्यांना हापूस पेटी विक्रीचे टार्गेट दिले जाते. प्रत्येक पेटीमागे त्यांना १५० ते २०० रुपये दलाली दिली जाते. हे विक्रेते पेटी भरताना पेटीत खाली कर्नाटकी आंबा आणि वर दर्शनी भागात हापूसचा थर लावतात. यावेळी हापूस आकाराने देखील लहान येत असल्याने त्याचा फायदा घेतला जात आहे. काही ग्राहकांना हापूस व कर्नाटक आंब्यातील फरक लक्षात येत नाही. त्याचा गैरफायदा हे किरकोळ व्यापारी घेत आहेत.

सध्या हापूसची देखील दरघसरण झाली आहे. ४ ते ६ डझनांच्या पेटीला ५०० ते २००० रुपयांपर्यंत तर २% चांगल्या हापूसला २ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. प्रति डझनला ७५ ते ३०० व चांगला हापूस ३५० ते ४५० रुपयांना उपलब्ध आहे. दुसरीकडे बाजारात कर्नाटक आंबा १० हजार ते १५ हजार क्रेट येत असून प्रति किलोला ६० ते १०० रुपये बाजारभाव आहे. त्यामुळे किरकोळ व्यापारी कमी दरात आंबा खेरीदी करून दोन्ही आंबे एकत्र करून ग्राहकांच्या माथी मारत आहेत. ग्राहक इतर आंब्याच्या तुलनेत आधी हापूसला प्राधान्य देतात. महागडा हापूस स्वस्त उपलब्ध होत असल्याने ग्राहकांची फसगत होत आहे.

हापूस कसा ओळखावा?

हापूस हा पूर्ण परिपक्व होतो तेव्हा आतून केशरी दिसतो तर कर्नाटकी आंबा पिवळा दिसतो. कच्चा हापूस हा हिरवा गर्द असतो, तर कर्नाटकी आंबा थोडा लालसर दिसतो.

एपीएमसी फळ बाजाराबाहेर किरकोळ विक्रेते येथून हापूस व कर्नाटकी आंबा घेऊन जातात व दोन्ही एकत्र करून हापूसच्या पेटीत भरून हापूस म्हणून विकतात. काही ग्राहक घाऊक बाजारापेक्षा बाहेर हापूस स्वस्तात मिळत असल्याने खरेदी करतात, परंतु त्या पेटीत कर्नाटकी हापूसची भेसळ केलेली असते.

– संजय पिंपळे, घाऊक फळ विक्रेता, एपीएमसी