११ गावांचा समावेश; देशातील पहिली खासगी स्मार्ट सिटी सिडकोशी करारबद्ध
खालापूर तालुक्यातील अकरा गावांचा समावेश असलेल्या देशातील पहिल्या खासगी स्मार्ट सिटीचा सिडकोबरोबर शुक्रवारी करार होत असून, लोकांनी लोकांसाठी राबविलेली ही पहिली संकल्पना आहे. सिडकोच्या केलेल्या आवाहनानुसार येथील ग्रामस्थ चार हजार हेक्टरपैकी चाळीस टक्के जमीन सिडकोला पायाभूत सुविधांसाठी देणार असून शिल्लक साठ टक्के जमिनीवर एक स्मार्ट सिटी उभारणार आहेत. सिडकोला पायाभूत सुविधांसाठी स्वेच्छेने देण्यात येणाऱ्या या जमिनीच्या बदल्यात या नगरीला पायाभूत सुविधा आणि पावणेदोन वाढीव चटई निर्देशांक मिळणार असून त्यात दीड लाख छोटी-मोठी घरे तयार होणार आहेत. या ठिकाणी तयार करण्यात छोटय़ा-मोठय़ा उद्योगांमुळे तीन लाख ७० हजाराची रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
खासगी प्रकल्पांसाठी नवीन कायद्यानुसार जमीन संपादन करता येत नसल्याने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी एक स्वेच्छा योजना जाहीर करण्यात आली आहे. तुमची चाळीस टक्के जमीन द्या, त्याबदल्यात पायाभूत सुविधा आणि एफएसआय घ्या अशी ही योजना
आहे.
नवी मुंबईपासून २५ किलोमीटर दूर खालापूर तालुक्यातील खालापूर, महड, शिरवली, वणवे, निंबोडे, निगडोली, नडोदे, कलोते रयती, कलोते मोकाशी, विनेगाव, कांवढळ या अकरा गावांच्या ग्रुप ग्रामपंचायतींनीे जून २०१५ रोजी एक ठराव करून आम्हाला एकत्रित विकास करावयाचा आहे असे सिडको व शासनाला कळविले आहे.

दोन टप्प्यात विकास
राज्य शासनाने सिडकोला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) येणाऱ्या २७० गावांचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. सिडकोने या गावांचा दोन टप्प्यात विकास करण्याचे ठरविले असून, पहिल्या टप्प्यातील पनवेल तालुक्यातील २३ गावांचा एक विकास आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे.

मगरपट्टाच्या धर्तीवर विकास
खालापूर ग्रुप ग्रामपंचायतीसाठी आकार अभिनव कन्सलटंट यांनी तयार केलेल्या या आराखडय़ात दहा लाखात अर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी घरे निर्माण केली जाणार असून ४६ लाखापर्यंत उच्च उत्पन्न गटाला येथे घर घेता येणार आहे.पुण्यातील मगरपट्टा वसाहतीच्या धर्तीवर हा विकास होणार आहे.

Story img Loader