पनवेल : खांदेश्वर वसाहतीमध्ये एक मुलगी घरात एकटी असताना दोघे अनोळखी व्यक्ती तीच्या घरात शिरले. तीच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आणि काही मिनिटांनी ते तिथून पळून गेले. याबाबात पीडीत मुलीने खांदेश्वर पोलीसांत गुन्हा नोंदविला आहे. अत्याचार करण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी त्यांचा चेहरा कापडाने झाकल्याने त्यांचे वर्णन पिडीतेला करता येत नसले तरी पोलीस संबंधितांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे पीडीतेने त्यावेळेस आरडाओरड करुनही शेजारच्यांना काहीच न एेकु गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

खांदेश्वर वसाहतीमध्ये लोकवस्तीच्या ठिकाणी ही गंभीर घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. अर्धा तास संबंधित अनोळखी व्यक्ती या पीडीतेच्या घरात होते. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक स्मिता ढाकणे यांनी या गंभीर प्रकरणाची तक्रार नोंदविल्यावर तातडीने शेजारच्या व्यक्तींकडे विचारपूस केली. तसेच घरातील वस्तूंवर बोटाचे ठसे मिळविण्यासाठी न्याय वैद्यक शास्त्र विभागाच्या पोलीसांकडून तपासणी सुरू केली. तसेच श्वान पथकाने सुद्धा पिडीतेच्या घरात व परिसरात तपासणी केली. पिडीतेच्या घराजवळील एका सीसीटिव्ही कॅमेरातून काही पुरावा मिळतो का याची चौकशी पोलीसांकडून सुरू असल्याचे पोलीसांनी सांगीतले.

Story img Loader