पनवेल : खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ ई मधील बी. एम. ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात रविवारी रात्री १० वाजता तीन चोरांनी रिव्हॉल्व्हर घेऊन सोन्याचे चांदीचे लाखो रुपयांचे दागिने लुटून नेले. ही सर्व घटना सराफाच्या दुकानातील सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. सराफ दुकानदाराने सायरन वाजवून मदत मागण्याचा प्रयत्न केला तरी कोणतीही मदत मिळाली नाही. परंतू सायरनच्या धाकेमुळे अवघ्या दोन मिनिटांत चोरट्यांनी हाताल लागेल तेवढे दागीने घेऊन चोरांचे त्रिकुट दुचाकीवर बसून पसार झाले.
खारघरमधील बी. एम. ज्वेलर्समध्ये हेल्मेट व रेनकोट घालून चोरटे सराफाच्या दूकानात दहा वाजता शिरले. हातामध्ये रिव्हॉल्व्हर डोक्यात हेल्मेट असल्याने सराफ दुकानातील तिघेही दुकानदार घाबरले. ज्या चोराच्या हातामध्ये रिव्हॉल्व्हर होती त्याने दुकानात शिरल्यावर पहिल्यांदा दुकानात हवेत गोळीबार केला. या दरम्यान एका दुकानदाराने सायरन वाजविण्याचा प्रयत्न केला. या सायरनच्या आवाजामुळे दूकानाबाहेरील रहिवाशांचे लक्ष दुकानाकडे वेधले. अनेक रहिवाशांनी स्वतःजवळील मोबाईल फोनमध्ये सराफ दुकानात सुरू असणारा थरार कैद केला. तर अनेकांनी चोर चोर असा आरडाओरडा करुन रहिवाशांनी मदतीसाठी बोलावले. पोलीस नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी फोन करण्यात आला.
या दरम्यान दुकानातील इतर दोन चोरट्यांनी दुकानातील काचेमध्ये ठेवलेले दागिने काढण्यासाठी दुकानातील काचा फोडण्याची सुरुवात केली. अवघ्या दोन मिनिटांत हा सर्व लुटीचा थरार झाला. हाताला जेवढा लुटीचा माल मिळेल तेवढा घेऊन चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले. चोरट्यांनी दुकानाबाहेर कोणी पकडू नये म्हणून त्यांच्या हातामधील रिव्हॉल्व्हरने हवेत गोळीबार केला. नवी मुंबईत मागील काही दिवसात महिलांवरील अत्याचार व खून, सराफाची लुटमार, गावात रात्रीची फिरणारी चोरांची टोळी यामुळे पोलीसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे ठाकले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस दलात आधुनिकता आणली मात्र रस्त्यांवर होणारे गुन्हे तातडीने थांबविणे हे पोलीस आयुक्तांसमोर मोठे आव्हान आहे.