सिडकोच्या खारघर, उलवा आणि द्रोणागिरी क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या पेण तालुक्यातील हेटवणे धरणात पुरेसा जलसाठा असून सिडकोने नुकत्याच नवीन टाकलेल्या सहा उपसा पंपांमुळे या भागाला पुरेसा पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. खारघरमध्ये कमी पाणीपुरवठय़ामुळे लोकभावना उफाळून आलेल्या असून स्थानिक रहिवाशांनी सिडकोच्या विभाग कार्यालयांवर मोर्चे काढून आपल्या तीव्र भावना प्रशासनाला कळविल्या होत्या. त्यामुळे सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी या पाणी तुटवडय़ाचा अभ्यास करून हेटवणे धरणातील सहा नादुरुस्त जलशुद्धीकरण पंप बदलण्यास प्राधान्य दिले आहे. खारघरला सर्वाधिक ७२ दशलक्ष लिटर पाणी लागत आहे. त्यामुळे पाणीटंचाई काळात या ठिकाणी आता टँकरचा धंदा तेजीत आला आहे.
नवी मुंबईत कधी नव्हे अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मोरबे व बारवी धरणातील जलसाठा कमी झाल्याने पालिका क्षेत्रात ही टंचाई अधिक जाणवू लागली आहे. मात्र सिडको क्षेत्रातील हेटवणे धरणाची स्थिती वेगळी असून या ठिकाणी पाणीसाठा पुरेसा आहे, पण केवळ नादुरुस्त पंपहाऊसमुळे सिडको क्षेत्राला पाणी मिळत नव्हते. त्यामुळे खारघर भागातील नागरिकांत मोठय़ा प्रमाणात नाराजी पसरली होती. त्यांच्या सहनशीलतेचा अंत विभाग अधिकाऱ्यांना काळे फासण्यात झाला होता. उलवा व द्रोणागिरी क्षेत्र हे कमी लोकवस्तीचे असल्याने त्या ठिकाणी इतकी नाराजी व्यक्त झालेली नाही. उलवा नोडला बारा, तर द्रोणागिरी नोडला दहा दशलक्ष लिटर पाणी लागत आहे, पण हे पाणीही मिळत नसल्याने तेथे राहण्यास जाणाऱ्या लोकांनी तूर्त माघार घेतली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी, विमानतळ, मेट्रो, नैनासारखे आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभे करणाऱ्या सिडको क्षेत्रात पाणीपुरवठा सुरळीत नसल्याचा संदेश जात होता. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांना ही परिस्थिती हाताळण्याचे आदेश दिले. त्या वेळी हेटवणे धरणात तर पाणीसाठा ५८ टक्के आहे, पण अनेक वर्षांच्या जुन्या पंपहाऊसमुळे खारघर, उलवा, द्रोणागिरी भागाला पाणी मिळत नसल्याचे लक्षात आले. चव्हाण यांनी येथील सहा पंप बदलण्याच्या कामाला प्राधान्य दिले असून त्यामुळे या भागाला भर उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

मोरबे धरणापेक्षा जास्त जलसाठा हेटवणे धरणात आहे, पण केवळ नादुरुस्त पंपांमुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे या कामाला प्राधान्य देण्यात आल्याने येथील पाणीटंचाई कमी होण्याची आशा आहे. पण नागरिकांनी दुष्काळग्रस्त स्थिती पाहता कमी पाण्याचा वापर करावा.
– राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको

Story img Loader