अप्पर पोलीस आयुक्त निशिकांत मोरे प्रकरणाला वेगळे वळण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : मित्राच्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी गृहमंत्र्यांनी निलंबित केलेले पुणे येथील मोटार विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त निशिकांत मोरे प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. मोरे यांच्या विरोधात तक्रार केलेल्या पीडित युवतीच्या नातेवाईकांवर खारघर पोलिसांनी खोटय़ा तक्रारी दाखल करणे, पोलीस खात्याची बदनामी करणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

हे प्रकरण सुरुवातीपासून वादग्रस्त ठरले आहे. २२ डिसेंबरला खारघर येथील गुरुद्वारासमोर झालेल्या पत्रकार परिषदेत एका शीख कुटुंबातील पती-पत्नी व मुलाने पोलीस उपमहानिरीक्षक मोरे यांनी त्यांचे पैसे हडपले असून त्यांच्या अल्पवयीन मुलीसोबत वाढदिवसाच्या समारंभावेळी केक भरविण्याच्या निमित्ताने केलेल्या गैरकृत्याचा तपशील मांडला होता. त्यानंतर मोरे यांच्यावर २६ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ९ जानेवारीला मोरे यांचा खारघर येथून अल्पवयीन मुलीच्या अपहरणात हात नसल्याचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केले. सध्या मोरे यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पीडित युवतीने आणि तिच्या भावाने २१ डिसेंबरला मोरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला होता. तसेच पीडितेच्या भावाने माझे अपहरण करण्याचा प्रयत्न असून मी लपून बसल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी यानंतर घटनास्थळी धाव घेतली, मात्र तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आले.मात्र पीडितेच्या नातेवाईकांनी घटना खरी असल्याचा दावा केला होता. ज्या ठिकाणी घटना घडली तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि मोरे यांच्याकडे काम करणाऱ्या पोलीस वाहकाचे मोबाइल लोकेशन तपासण्याची मागणी केली होती. याबाबत पोलिसांनी तपास केला असता त्यातही तथ्य आढळले नाही. याप्रसंगी मोरे आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन गेले होते तर कर्मचारी राकेश गायकवाड मोरे यांची वाट पाहात थांबले होते. त्यावेळी मोरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या पीडित युवतीचे आई-वडील आणि भाऊ  या ठिकाणी आले आणि गायकवाड यांनाच धक्काबुक्की केली होती.  या सर्व घटनांचा तपास केला असता पीडित युवतीच्या नातेवाईकांनी बनाव केल्याचे समोर आल्याने पीडितेचे वडील आणि भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ दोनचे उपायुक्त अशोक दुधे यांनी याला दुजोरा दिला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kharghar police lodge false complaints against victim relatives zws