पनवेल: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी लाखो श्री सदस्य खारघर वसाहतीमध्ये दाखल होणार असल्याने शीव पनवेल महामार्गावरुन वसाहतीमध्ये शिरण्यासाठी काेपरा गावासमोरील महामार्गावर अजून तात्पुरता रस्ता बांधण्यात आला होता. पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी हा रस्ता गुरुवारी पोलीस बंदोबस्तामध्ये उखडण्यात आला. यापूर्वीही सिडको महामंडळाच्या अधिका-यांनी हे काम हाती घेतले होते. मात्र स्थानिक रहिवाशांनी सिडको मंडळाचा हा प्रयत्न हाणून पाडला. स्थानिक रहिवाशांनी गुरुवारी कोणताही अडथळा आणू नये यासाठी खारघरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीन शेजवळ यांनी पोलीस बंदोबस्त येथे तैनात करुन रस्ता तोंडण्याचे काम सूरु केले. नवीन बांधलेला रस्ता पुन्हा बंद केल्याने वाहतूक कोंडीसह पुन्हा एकदा खारघरवासियांना अरुंद पुलावरुन प्रवास करावा लागणार आहे.
१६ एप्रीलला खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा होणार असल्याने सिडको मंडळाने तातडीने वसाहतीमधील प्रवेशव्दाराची संख्या वाढविण्यासाठी हा रस्ता बांधला होता. तात्पुरत्या स्वरुपात हा रस्ता असल्याने या परिसरातील माजी नगरसेविका लीना गरड यांच्यासह अनेक रहिवाशांनी हा रस्ता कायम ठेऊन पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याखालून मोठ्या व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याची मागणी केली होती. सिडको अधिकारी व कर्मचारी गेल्या काही दिवसांपुर्वी हा रस्ता उखडण्याचे काम करत असताना माजी नगरसेविका गरड व इतरांनी सिडको अधिका-यांना काम करण्यास मज्जाव केला. सिडकोच्या अधिका-यांकडे कार्यआदेश दाखवा अशी मागणी केली. परंतू गुरुवारी सिडको मंडळाने रस्ता उखडण्याच्या कामाचे आदेश घेऊनच कर्मचारी काम करत होते. पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनीही आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये हा रस्ता बंद करण्याचे सूचना दिल्याने पोलीसांनी रस्ता बंदचे काम कऱण्यासाठी बंदोबस्त दिला होता.
हेही वाचा >>>आंबिवलीतून चरस विकणारी महिला अटक
सिडको मंडळ व पनवेल महापालिका आणि पोलीस विभागाने तात्पुरता मार्ग बंद करण्यासाठी जेवढी कर्तव्यदक्षता दाखविली तेवढीच कर्तव्यदक्षता खारघरला नवा प्रवेशव्दार मिळण्यासाठी दाखवावी अशी माफक अपेक्षा खारघरच्या रहिवाशांची आहे.