Kharghar Road Rage Murder: नवी मुंबईतील खारघर येथे रस्त्यावरील किरकोळ भांडणातून ४५ वर्षीय आयटी अभियंता शिवकुमार शर्मा यांची दोघांनी डोक्यात हेल्मेटचे घाव घालत हत्या केली होती. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. एक आठवड्यापासून हत्या करणारे आरोपी फरार होते. मात्र यापैकी एका आरोपीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. रेहान शेख (२०) नामक आरोपीला पोलिसांनी पकडले असून दुसरा आरोपी फैजान शेख (२०) हा अद्याप फरार आहे. दोघेही अनुक्रमे नागपाडा आणि आग्रीपाडा येथे राहणारे होते. दोघेही डिलिव्हरी बॉयचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रकरण काय आहे?
३ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथे ओव्हर टेक करण्याच्या वादातून रात्री ८.३० वाजता दोन्ही आरोपींनी शर्मा यांची डोक्यात हेल्मेटचे घाव घालून हत्या केली. यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. विविध ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण गोळा करून पोलिसांनी आरोपींचा माग काढला. तसेच प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून गुन्ह्याचा उलगडा केला. ओव्हरटेक करत असताना शर्मा आणि दोन्ही आरोपींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी बेलपाडा आणि उत्सव चौक दरम्यान शर्मा यांनी एका आरोपीला लाथ मारली. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी शर्मा यांचे हेल्मेट घेऊन त्यांच्यात डोक्यात हेल्मेटचे घाव घातले.
आरोपींनी मारहाण करून तिथून पळ काढला. त्यानंतर शर्मा स्वतः दुचाकी घेऊन खारघर पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे त्यांनी मारहाण झाल्याची माहिती दिली. तसेच आरोपींचे व्हिडीओही दिले. मात्र पोलीस ठाण्यात ते अचानक कोसळून पडले. पोलिसांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले, पण तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आरोपींनी मारहाण केल्यानंतर शर्मा यांना बाहेरून काही इजा झाल्याचे दिसले नव्हते. त्यानंतर आरोपी खारघर येथे आयोजित केलेल्या मुस्लीम समुदायाच्या समारंभाला गेले. तिथून रात्री १०.३० वाजता ते घरी गेले.