टोल दरात दहा ते तीस रुपयांची वाढ
शीव-पनवेल महामार्गावरील खारघरजवळील कोपरा व कामोठे येथील टोलनाक्याचा ठेका मंगळवारी सायंकाळी रद्द करण्यात आला. हा टोलनाका ‘एमएसआरडीसी’कडे हस्तांतरित करण्यात आला. परंतु या टोलनाक्यावरील दरांमध्ये १ एप्रिलपासून वाढ करण्यात आली आहे. ही वाढ वर्षभरासाठी असणार आहे, तसे सूचनापत्रक शासनाने काढलेले आहे. ही दरवाढ दहा ऱ्पये ते १३० रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. त्यानुसार टोलवसुलीही सुरू झाली आहे.
टोलनाका ठेकेदार मे. डी. आर सर्व्हिसेस कंपनी नियमानुसार टोलवसुलीची रक्कम सरकारकडे जमा करत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या कंपनीला नोटीस दिली होती. मे. डी. आर. सर्व्हिसेस यांच्याकडून अखेर मंगळवारी टोलनाका सार्वजनिक बांधकाम विभागाने ताब्यात घेतल्यानंतर तो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आला. त्यानंतर महामंडळाने नेमणूक केलेल्या मे. सहकार ग्लोबल लि. यांच्याकडून टोलवसुली सुरूकरण्यात आली आहे.
नियमानुसार दर तीन वर्षांनंतर दरवाढ करण्यात येते. परंतू खारघर टोलनाक्यावर दरवाढ करण्यात आली नव्हती.
सुरुवातीला सायन-पनवेल टोलवेज प्रा.लि.यांच्याकडून टोलवसुली करण्यात येत होती. त्यानंतर शासनामार्फत ईगल कंपनीद्वारे टोलवसुली करण्यात येत होती. त्यानंतर मे.डी.आर सर्व्हिसेस यांच्याकडून टोलवसुली करण्यात येत होती. त्यामुळे तर मंगळवारपासून ‘एमएसआरडीसी’तर्फे मे.सहकार ग्लोबल लि.यांच्याकडून टोलवसुली करण्यात येणार असून दरात वाढ करण्यात आली आहे. यात टेम्पो, मिनी बस, ट्रक, ट्रेलर या जड वाहनांच्या टोलदरात वाढ करण्यात आली आहे. हे वाढीव दर ३१ मार्च २०२० पर्यंत असणार आहेत. त्यामुळे जडवाहनांना अधिक टोल द्यावा लागणार आहे.
नियमानुसार ३ वर्षांनंतर प्रत्येक टोलनाक्यावरील दर वाढवण्यात येतात. परंतु खारघर येथील टोलनाक्यावरील दर वाढवण्यात आले नव्हते. त्यामुळे शासनाने नियमानुसार ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजल्यापासून ही दरवाढ सुरू केली आहे.
-किशोर पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग