नेरूळ ते उरण रेल्वेमार्गावरील जासई, द्रोणागिरी स्थानक उभारणीही वेगात
उरण : वन विभागाच्या जमिनींबाबतच्या मंजुरीसाठी रखडलेले खारकोपर ते उरण दरम्यानचे रेल्वेमार्गाचे काम सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आल्याने लवकरच नेरूळ ते उरण रेल्वे सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नवी मुंबईतील नेरूळ (सीवूड्स) ते उरण दरम्यानचा २७ किलोमीटरचा रेल्वेमार्ग १९९७ पासून रखडला असून या मार्गातील खारकोपपर्यंत रेल्वे सुरू झाली आहे. मात्र खारकोपर ते जासई दरम्यानच्या वन विभागाच्या जमिनीची परवानगी मिळत नसल्याने हे काम पूर्ण झाले नव्हते. या कामाला वनविभाकडून परवानगी मिळाल्याने सध्या खारकोपर ते जासई दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे काम वेगाने सुरू झाले आहे. उरण परिसरातील औद्योगिक विभागामुळे येथील नागरी वस्तीतही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या दळणवळणाचे साधन असलेल्या रेल्वेची १९९७ साली घोषणा करण्यात आलेली होती. हा मार्ग तयार करण्यासाठी रेल्वे व सिडको यांच्यात भागीदारी करार करण्यात आला आहे. मात्र यातील नेरूळ ते उलवे नोडमधील खारकोपपर्यंतच ही सेवा सुरू होऊ शकली होती.
त्यानंतर खारकोपर ते जासई या केवळ तीन ते चार किलोमीटरच्या अंतरात खासगी व वनविभागाच्या जमिनीच्या संपादनाचा प्रश्न प्रलंबित होता. यातील शेतकऱ्यांच्या खासगी जमिनी सिडकोकडून संपादित करण्यात आल्या. मात्र याच मार्गात येणाऱ्या वन विभागाच्या जमिनींना मंजुरी मिळत नव्हती. ही मंजुरी २०२१ मध्ये मिळाल्याने सध्या या मार्गाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. यातील जासई ते उरण दरम्यानचा मार्ग तयार रेल्वेच्या अखित्यारीत मोडतो. त्यामुळे या मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे या रेल्वेमार्गावरील जासई, रांजणपाडा, न्हावा -शेवा, द्रोणागिरी व उरण या मार्गावरील स्थानकांच्या उभारणीच्या कामानेही वेग घेतला आहे. खारकोपर ते उरणदरम्यानच्या रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू झाले असून रेल्वेकडून सप्टेंबर २०२२ पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिल कुमार यांनी दिली आहे.