आता हिशोब अनिल परबचा उद्या रत्नागिरीला जाऊन पोलिसांची भेट घेणार आहे. लवकरच अनिल परब यांच्या बेकायदा रिसोर्टवर कारवाई केली जाणार, अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली. शुक्रवारी सोमय्या खाजगी कार्यक्रमासाठी नवी मुंबईतील ऐरोलीत आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी परबांना इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ऐतिहासिक चित्रपटांसाठी इतिहास तज्ज्ञांची समिती गठीत करा; आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

महाराष्ट्र सरकारने अनिल परब यांच्या विरोधात चिटिंग फ्रॅाड फोरजरीसाठी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मी उद्या रत्नागिरीत जाणार आहे. रत्नागिरी पोलीस माझा जबाब नोंदवून घेणार आहेत. काल भारत सरकारच्या याचिकेवर दापोली न्यायालयाने सी.आर.झेडमध्ये रिसॉर्ट बांधले म्हणून आणखी एक समन्स अनिल परब यांना बजावले आहे. आता अनिल परब यांना न्यायालयात देखील हजर राहावे लागणार आहे आणि हिशोब हा द्यावाच लागणार आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत. तसेच माझ्या तक्रारीवरून १४ नोव्हेंबरला परब यांच्या रिसोर्टवर कारवाई केली जाणार आहे, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. परब यांच्या विषयी माहिती दिल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानच्या कबरी शेजारील अतिक्रमण कारवाईबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काढता पाय घेतला.

अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यात येईल. यासाठी नऊ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात ठेकेदाराची नियुक्ती होईल. ९० दिवसांत अनिल परब याचे साई रिसॉर्ट पाडण्यात येईल”, असा दावा किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

हेही वाचा- नवी मुंबई : राज्यातील पहिली आयटीएमएस प्रणाली सेवा बंद; अपडेट न केल्यास ९ कोटींचा निधी जाणार वाया

नेमकं काय आहे प्रकरण?

दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून त्याच्या जमीन खरेदी व बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या रिसॉर्टच्या आर्थिक व्यवहाराचा उल्लेख अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या शपथपत्रात केला होता. या रिसॉर्टच्या वीजजोडणीसाठी अर्ज करतानाच त्यांनी घरपट्टीही भरली होती, असा दावा किरीट सोमय्यांचा दावा आहे. दरम्यान, या आरोपानंतर ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सूरू आहे. या रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नसून याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांनी दिली होती.

किरीट सोमय्या विचारलेल्या कुठल्याही मुद्द्यावर बिनधास्त बेधडक उत्तर देतात अशी त्यांची ख्याती आहे मात्र  संजय राउत यांच्याबाबत त्यांनी उत्तर देण्याचे टाळल्याने उपस्थित  स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.