चव-आकारात साधम्र्य; आवक लवकर सुरू
काही वर्षांपूर्वीपासून शेजारच्या कर्नाटक राज्यातील हापूस आंब्याने मुंबईच्या फळबाजारात शिरकाव केल्यानंतर आता केरळ व तामिळनाडू येथील हापूस आंब्याने कोकणच्या हापूसला स्पर्धा निर्माण केली आहे. पहिल्यांदाच मुंबईत पाठविण्यात आलेला तामिळनाडूच्या पूर्व भागातील हापूस आणि कोकणातील हापूस यांची चव आणि आकारात साम्य असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी कोकणातील हापूस आंब्याची तामिळनाडूतील हापूस आंब्याबरोबर यंदा टक्कर होण्याची चिन्हे आहेत.
कोकणातील हापूस म्हणून ‘कर्नाटकचा हापूस’ गेली अनेक वर्षे बाजारात विकला जात आहे. गेल्या महिन्यात कोकणातील हापूस आंब्याची पहिली पेटी आल्यानंतर पुन्हा आवक झालेली नाही. १५ जानेवारीनंतर कोकणातील हापूस आंब्याची थोडीफार आवक सुरू होण्याची शक्यता आहे, मात्र ही आवक सुरू होण्याअगोदरच कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या दाक्षिण भारतातील हापूस आंब्याची आवक सुरूझाली आहे. तामिळनाडूतील हापूस आंब्याने मुंबईतील बाजापेठ काबीज करण्यासाठी पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. विशेष म्हणजे हा हापूस आंबा कोकणातील देवगड भागात पिकणाऱ्या हापूस आंब्यासारखाच असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या ४०० ते ५०० डझन तामिळनाडूचे आंबे तुर्भे येथील घाऊक फळबाजारात दाखल होत आहेत.
या आंब्यांची आवक सध्या मर्यादित असल्याने ते ९०० ते १२०० प्रति डझन किमतीत विकले जात आहेत. अशावेळी १५ दिवसांनी बाजारात येणाऱ्या कोकणातील हापूस आंब्याला यंदा तामिळनाडूच्या हापूसला टक्कर द्यावी लागणार आहे.
फळ बाजारात कर्नाटक, केरळ, तामिळनाडू येथील हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे. तामिळनाडूतील हापूस पहिल्यांदाच दाखल झाला आहे. त्यामुळे कोकणातील आणि तामिळनाडूतील असे दोन्ही हापूस घरी नेऊन खाऊन पाहिले. त्यांची चव आणि आकार सारखाच आहे हे विशेष.
– संजय पानसरे, फळ व्यापारी, एपीएमसी बाजार, तुर्भे