बदलते हवामान, अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव आणि वाढत्या खतांच्या किमती, कर्नाटकी हापूस आंब्याचे आक्रमण या दृष्टचक्रात अडकलेल्या कोकणातील हापूस आंब्याची आवक घटली आहे. केवळ ३९ हजार पेटय़ा तुर्भे येथील फळबाजारात आल्या आहेत. यातील दहा हजार पेटय़ा कर्नाटकी हापूस आंब्याच्या आहेत. गतवर्षी ४८ हजार पेटय़ा आल्या होत्या. विशेष म्हणजे आवक कमी होऊनही भाव वाढलेले नाहीत. फळबाजाराच्या अर्थशास्त्रात हे पहिल्यांदाच घडत आहे.
यंदा कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन कमी आहे. फळधारणा उशिरा झाल्याने जो काही चांगला हापूस आंबा बाजारात येणार आहे. त्याला आणखी एक महिना उजाडणार आहे. काल्टरच्या या जमान्यात हापूस आंबा जानेवारी महिन्यापासून बाजारात उपलब्ध होऊ लागला आहे पण सर्वसाधारणपणे कोकणातील आंबा बागायतदार मार्च-एप्रिल महिन्यात येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी हापूस आंबा घाऊक बाजारात पाठविण्यासाठी परंपरा आहे. या दिवशी हापूस आंब्याची देव्हाऱ्यात विधिवत पूजा करून चार आंबे देवाला ठेवल्यानंतर मुंबईत पाठविला जातो.
स्पर्धेच्या या युगात ती परंपरा आता मोडीत निघाली असून बाजारभाव चांगला मिळावा यासाठी हापूस आंबा बागायतदार बऱ्यापैकी फळधारणा झाल्यानंतर झाडावरून काढून बाजारात विकत असल्याचे चित्र दिसून येते मात्र काही बागायतदार या गुढीपाडव्याची आजही आतुरतेने वाट पाहत असल्याचे व्यापारी सांगतात.
त्यामुळे या दिवशी नेहमीपेक्षा हापूस आंब्याची आवक जास्त होत असल्याचा अनुभव आहे पण यंदा गेली आठवडाभर सुरू असलेली ३५ ते ४० हजार पेटय़ांची आवकच या दिवशीदेखील झाली आहे. शुक्रवारी गुढीपाडव्याच्या दिवशी ३९ हजार ५७३ पेटय़ा फळबाजारात दाखल झालेल्या आहेत. यात कर्नाटकी हापूस आंब्याचा समावेश असून त्या १० हजार पेटय़ा असल्याचे व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले.
बाजारात किरकोळ विक्रेत्यांना कर्नाटकी हापूस आंबा ५० ते १०० किलो रुपयांनी मिळत असल्याने ७०० ते ८०० रुपये डझन कोकण हापूस आंब्याची मागणी कमी झाली आहे.
पाच, सहा, सात, आठ किंवा नऊ डझनाच्या असणाऱ्या कोकणातील हापूस आंब्याच्या लाकडी पेटय़ांना त्यांच्या आकाराप्रमाणे एक ते साडेतीन हजार रुपयांचा भाव मिळत आहे.
‘करनाटकु’ हापूस.
आवक कमी असल्यास भाव जादा मिळत असल्याच्या अनुभवाच्या विरोधात सध्या फळबाजारात घडत असून कर्नाटकी स्वस्त हापूस आंब्यामुळे बाजारातील गणित कोलमडून गेले आहे. कोकणातील हापूस आंब्याला मिळणारा भाव हा तुलनेने कमी आहे.