गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचे मत
भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर यांना राज्यमंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शब्द टाकला आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तारात ठाकूर यांचे नाव असेल, असे रविवारी कळंबोलीत झालेल्या गर्जा महाराष्ट्र या सोहळ्यात शिंदे यांनी जाहीर केले. भाजपला कोकणात स्थान निर्माण करायचे असेल तर कोकणातील नेत्यांना मंत्रिमंडळात नेतृत्व मिळणे गरजेचे आहे. तसेच सध्या मंत्रिमंडळात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा यांसारख्या प्रदेशाला स्थान आहे, मात्र कोकणाला नाही याकडे गृहराज्यमंत्री शिंदे यांनी लक्ष्य वेधले.
कळंबोली व रोडपाली हा परिसर ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रात आल्यामुळे या परिसरात लवकरच ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या परिसरात सध्या राजकीय पक्षांनी सामाजिक सेवा पुरविण्याचे काम जोरात सुरू केले आहे. भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने गुढीपाडव्यापासून सतत तीन दिवस येथे गर्जा महाराष्ट्र हा सोहळा हाती घेण्यात आला.
शिवकाळातील शस्त्रांच्या प्रतिकृती, किल्ले व पोवाडय़ांची स्पर्धा येथे भरविण्यात आली. तसेच आयोजकांनी शिवकीर्तन येथे ठेवले होते. कळंबोली वसाहतीमध्ये अशा प्रकारचा शिवकाळाचे स्मरण करून देणारा हा पहिलाच उपक्रम अनुभवायला मिळाल्याने या ठिकाणी लहानग्यांपासून ते ज्येष्ठांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली. तीन दिवसांत कळंबोलीतील सुमारे २० हजार रहिवाशांनी येथे भेट दिल्याची नोंद आयोजकांकडे नोंदविली गेली आहे. रविवारी या सोहळ्याच्या समारोपाच्या दिवशी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते शिवशाहिरांचा व किल्ल्यांची प्रतिकृती स्थापन करणाऱ्यांचा सत्कार झाला.