शेखर हंप्रस, लोकसत्ता
नवी मुंबई</strong> : कोपरखैरणेत पार्किंग समस्येने उग्र रूप धारण केले आहे. रस्त्यावरून दुतर्फा पार्किंग आणि पदपथावरही दुचाकी पार्किंगमुळे लोकांनी चालावे कसे असा प्रश्न आहे. त्यात एका अनोळखी व्यक्तीने एक फलक लावला आहे. त्यामुळे पादचारी नागरिकांची व्यथाच त्या अनोळखी व्यक्तीने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता तरी वाहतूक पोलीस कडक कारवाई करतील अशी आशा नागरिकांना आहे तर पार्किंग पदपथावर होऊ नये अशी रचना उभी करावी अशी अपेक्षा वाहतूक शाखेकडून व्यक्त होत आहे.
“नागरिकांना नम्रतेची सूचना – कृपया नागरिकांनी रोड वर चालावे. वाहन चालकांनी फुटपाथ वरून गाडी चालवावी. नागरिकांना त्रास न देता- वैतागलेला सामान्य माणूस” असा इंग्रजी आणि मराठीतून फलक कोपरखैरणे सेक्टर १९ आणि १८ च्या रस्त्यावर लावण्यात आला आहे. सदर फलक सम-विषम पार्किंग सूचना ज्या ठिकाणी लिहिण्यात आला त्याच ठिकाणी लावण्याची काळजी घेण्यात आली आहे. या फलकाकडे इथून जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे.
हेही वाचा >>> खोपटे मार्गावर एनएमएमटी बसने दुचाकीस्वाराला चिरडले; एकाचा मृत्यू तीन जखमी, संतप्त नागरिकांच्या रास्ता रोको
तीन टाकी ते सेक्टर २३ या मार्गावर सर्वच प्रकारची दुकाने तसेच मोठी शाळा आहे. तसेच दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. साहजिक वाहतूक कोंडी वारंवार होत असते. बेशिस्त वाहन चालवणे आणि वाटेल तसे पार्किंग करणे हा वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारे घटक ठरले आहेत.
वाहतूक पोलीस सातत्याने या ठिकाणी कारवाई करत असतात. मात्र वाहनचालकांना सामाजिक भान नाही, त्यात वाहतूक पोलीस संख्याबळ अपुरे त्यामुळे आम्ही कारवाई करून करून किती करणार असा प्रश्न एका वाहतूक पोलिसाने केला. पदपथवर बिनदिक्कत केवळ दुचाकी नव्हे तर चारचाकीही उभी केली जाते. इमारतीत राहणारे वाहनचालक इमारतीच्या गेटवर गाडी पार्क करतात. पादचाऱ्यांना पदपथावरून चालताना अचानक समोर आडवी गाडी किंवा रिक्षा दिसते त्यामुळे पुन्हा रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते. या समस्येने उग्र रूप धारण केल्यावर मनपाने त्यावर उपाययोजना म्हणून पदपथाला कठडे (ग्रील) लावले. मात्र आपल्याला हवे तिथे ग्रील कापण्यात आले आणि गाड्या पदपथावर लावणे सुरू झाले.
हेही वाचा >>> करवाढ नसलेल्या अर्थसंकल्पाची शक्यता; नवी मुंबई महापालिकेच्या ठेवी १,३८४ कोटींवरून १,५०० कोटींवर जाणार
याबाबत विचारणा केली असता पुन्हा संबंधित विभागाला कळवले जाईल असे सांगण्यात आले. याच परिसरात विविध वस्तू घरपोच देणारे एक दुकान असून डिलिव्हरी बॉय कर्मचाऱ्यांच्या सर्वाधिक गाड्या या पदपथावरच उभ्या केल्या जातात.
हॉटेलसमोर गाड्या पार्क करू नये म्हणून नो पार्किंगचा फलक पदपथाच्या ग्रीलला वेल्डिंग करून लावला आहे. ही बाब विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली, याला तीन आठवडे उलटून गेले मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. – विश्वास जाधव, वाहनचालक
नागरिकांना चालण्यास कमी आणि गाड्या पार्किंगसाठी जास्त या उद्देशानेच पदपथ बांधले आहेत की काय असा प्रश्न पडत आहे. – अविनाश भानुशाली, ज्येष्ठ नागरिक