पनवेल ः तळोजा येथे मोठ्या प्रमाणात सिडको महामंडळाचे महागृहनिर्माणाचे काम सूरु आहे. पावसाळ्यात बांधकाम करणे शक्य नसल्याने पावसाळ्यापूर्वी कामे आटपून घेण्यासाठी झपाटा सूरु आहे. मात्र सूरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्याने बी. जी. शिर्के कंपनीचे काम सूरु असताना क्रेन ऑपरेटरच्या दुर्लक्षामुळे एका मजूराच्या अंगावर कॉलम हाताळताना क्लीप तुटून अंगावर कॉलम पडून मजूराचा मृत्यू झाला.
बी. जी. शिर्के या बांधकाम कंपनीला सिडको महामंडळाने तळोजातील प्रधानमंत्री आवास योजनेतील इमारती बांधण्याचा ठेका दिला आहे. मागील सहा वर्षांपासून ही कामे सूरु आहेत. बी. जी. शिर्के कंपनीचे काम कऱणारे हजारो मजूर कंपनीच्या लेबरकॅम्पमध्येच राहतात. तीन दिवसांपूर्वी (ता.२७) सकाळी अकरा वाजता इमारत क्रमांक २ येथे बांधकाम सूरु असताना क्रेन ऑपरेटर २४ वर्षीय हैदरअली शेख याने क्रेन चालविताना हलगर्जी केल्याने ३५ वर्षीय मनोज सोरन याचा मृत्यू झाला. क्रेनवर कॉलम हाताळण्याचे काम सूरु होते. मात्र कॉलम हाताळण्यापूर्वी हैदरअलीने क्रेन शेजारी उभ्या असणा-या मजूरांशी सूरक्षेसंबंधी सूरक्षेच्या काळजी घेण्याविषयी सांगणे गरजेचे होते. तसेच कॉलमची एक क्लीप तुटल्यानंतर दूस-या क्लीपच्या आधारे हैदरअलीने कॉलम उचलल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीसांनी स्वताहून घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर गुन्हा नोंदविला आहे. यापूर्वी बी. जी. शिर्के कंपनीच्या बांधकाम ठिकाणी मजूराचा मृत्यू झाल्यानंतर तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश काळदाते यांनी बी. जी. शिर्के कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांवर गुन्हा नोंदविला होता. मात्र सूरक्षेचे नियम धाब्यावर बसवून काम करत असल्याने बी. जी. शिर्के कंपनीत कामादरम्यान मजूरांच्या मृत्यूचे सत्र सूरुच आहे.