पंखे बंद, गर्दुल्ल्यांचे बस्तान; मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; फेरीवाल्यांचा विळखा
बंद पडलेले पंखे, शोभेपुरत्याच उरलेल्या पाणपोया, वाढती गुन्हेगारी, अस्वच्छता, भिकारी-गर्दुल्ल्यांचे बस्तान आणि मोकाट श्वानांचा वावर.. आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असल्याचा तोरा मिरवणाऱ्या हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांचे फलाट मात्र समस्यांनी ग्रासलेले आहेत. ९०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात अलेल्या या स्थानकांतील प्रवासी मात्र रोज अनेक आव्हानांचा सामना करत आहेत.
नवी मुंबईत जाण्या-येण्यासाठी पनवेल ते मुंबई आणि वाशी ते ठाणे असा हार्बर मार्ग तयार करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत १४ लाख लोकसंख्या आहे. याव्यतिरिक्त नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानेही अनेक जण नवी मुंबईत ये-जा करतात. स्थानकांवरील अपुऱ्या सोयीसुविधांचा फटका त्यांना बसतो. एकेकाळी आलिशान म्हणून ओळखली जाणारी ही स्थानके योग्य देखभालीअभावी गैरसोयीची ठरू लागली आहेत.
ऐरोली येथून जाणाऱ्या रेल्वेमार्गानजीक असलेल्या झोपडय़ांमुळे गाडय़ांच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे. मध्यंतरी रबाळे रेल्वे स्थानकाजवळ लोकल थांबली असताना एका महिलेची पर्स खेचण्यात आली. त्याच वेळी लोकल सुरू झाल्यामुळे ही महिला धावत्या लोकलमधून खाली पडली. उपचारादरम्यान तिला जीव गमवावा लागला. अशीच एक घटना ऐरोलीतील एका महाविद्यालयीन तरुणाच्या बाबतीतही घडली. या तरुणावर प्रवासादरम्यान गर्दुल्लय़ांनी हल्ला चढवला होता. या हल्लय़ात त्याचा मृत्यू झाला. अशा अनेक घटनांमुळे आजदेखील नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांतील सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे स्पष्ट होते.
रेल्वे मार्गालगत संरक्षक भिंत नसल्यामुळे नागरिक रेल्वे मार्ग ओलांडून जातात आणि अपघातांत जीव गमावतात. तुर्भे रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांचा व झोपडय़ांचा विळखा पडला आहे. त्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जाते. जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांमधील सार्वजनिक शौचालयांत अस्वच्छतेमुळे दरुगधी पसरली आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस अमली पदार्थाचे सेवन सर्रास चालते. गर्दुल्ल्यांचा घोळका तेथे नेहमीच बसलेला असतो.
तुर्भे रेल्वे स्थानक सिडनी रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर बांधल्याचा दावा सिडको करते, मात्र रेल्वे स्थानकासमोरील झोपडपट्टीतील रहिवासी आराम करण्यासाठी स्थानकात येतात. ते तिथेच झोपलेलेही दिसतात. रबाळे रेल्वे स्थानकातील छताचा पत्रा दोन वर्षांपूर्वी अचानक पडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.
भविष्यात हार्बर मार्गावरही वाढीव डब्यांच्या गाडय़ा चलवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्याचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. बंद पडलेले इंडिकेटर, अपुऱ्या तिकीट खिडक्या या समस्या सुरुवातीपासून ‘जैसे थे’च आहे. अपंग प्रवाशांसाठी स्वतंत्र मार्गिका असावी ही जुनी मागणी अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. अनेक रेल्वे स्थानकांवर अपंगांसाठी पुरेशा सोयी नसल्याचा आरोप अपंगांच्या संघटनांकडून केला जात आहे.
उन्हाळ्यात हाल
अनेक रेल्वे स्थानकांतील पंखे बंद पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना उकाडय़ातच लोकलची प्रतीक्षा करावी लागते. पाणपोया तर केवळ शोभेपुरत्या उरल्या आहेत. काही पाणपोयांमध्ये पाणीच नाही, काहींचे नळ तुटलेले आहेत तर काही ठिकाणी प्रचंड अस्वच्छता आहे.
सुरक्षेचा प्रश्न गंभीर
फलाटांवर आणि भुयारी मार्गात नेहमीच मोकाट कुत्रे फिरत असतात. ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखरणे या रेल्वे स्थानकांच्या पूर्वेस तिकीट खिडक्या नाहीत. तिथे संध्याकाळी प्रवाशांची फारशी वर्दळही नसते. पथदिवे बंद असतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. त्या पाश्र्वभूमीवर कोपरखरणे, तुभ्रे, ऐरोली या रेल्वे स्थनकांत बंकर्स उभारण्यात आले होते. पण आता त्यांच्या कचराकुंडय़ा झाल्या आहेत.
कोपरखरणे रेल्वे स्थानकांत पिण्यास पाणी नाही. पंखे बिघडलेले आहेत. खाद्यपदार्थाचे स्टॉल नाहीत. वाहनतळाची जागा अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेली असते. स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तरीही वाहने चोरीला जातात. रेल्वे व सिडकोने याकडे वेळीच लक्ष पुरवणे आवश्यक आहे.
– दिनेश भोगले, रेल्वे प्रवासी