तुटके पदपथ, उघडी गटारे, पाण्याविना शौचालये

मूळ प्रकल्पग्रस्तांची हक्काची शेतजमीन संपादित करून वसवण्यात आलेले नवी मुंबई शहर स्वच्छ शहराचे बिरुद मिरवीत असताना गावांतील प्रकल्पग्रस्त मात्र अस्वच्छतेतच दिवस ढकलत आहेत. तुटलेले पदपथ, उघडी गटारे व इतर अनेक गैरसोयी या भागांत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण सुरू होईल तेव्हा गावातही येऊन सर्वेक्षण करण्यात यावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात १९ गावे आहेत, मात्र तेथील गैरसोयींमुळे रहिवाशांना आपण नवी मुंबईच्या वेशीबाहेरच असल्यासारखे वाटते. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पहाटे सहापासून कामावर तैनात होत आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यांत जाऊन सगळीकडे स्वच्छता असल्याची खात्री करून घेत आहेत. त्याच त्याच भिंतींची वारंवार रंगरंगोटी केली जात आहे. शहराच्या विविध भागांत सर्वेक्षण करून नागरिकांना प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेत कोणतीही उणीव राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. पालिका आयुक्त रामास्वामी एन. सुट्टीच्या दिवशीही शहरातील शौचालयांचे सर्वेक्षण करीत आहेत. शहरात स्वच्छ सर्वेक्षणासाठी अशी लगीनघाई सुरू असताना गावांकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

गावांतील शौचालयांची अवस्था बिकट आहे. सानपाडा गावात पदपथ खचलेले, तुटलेले आहेत, गटारे उघडी आहेत. गटारांवरील झाकणे तुटली आहेत. बोनसरीत शौचालयांची दुरवस्था आहे. काही ठिकाणी फिरती शौचालये आहेत, पण तिथे पाणी नसल्यामुळे गैरसोय होत आहे. बेलापूर, दिवाळे ते दिघ्यापर्यंतची गावे नागरी सुविधांपासून वंचित आहेत.

पालिका मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर रंगरंगोटी करीत आहे. शहरातील दुभाजक रंगवले जात आहेत. तुर्भे परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. हे सर्व होत असताना नवी मुंबई शहराचा मूळ घटक असलेल्या गावांकडेही तितकेच लक्ष दिले जावे, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. मूळ गाव व शहर यांच्यातील ही दरी कधी कमी होणार, असा प्रश्न रहिवासी विचारीत आहेत.

नवी मुंबई वसवण्यासाठी आम्ही आमच्या जमिनी दिल्या. परंतु आज गावे विकासापासून वंचित आहेत. सानपाडा गावातील गटारे उघडी आहेत. पदपथ तुटले आहेत तर गटारांवरील झाकणे तुटलेली आहेत. स्वच्छ सर्वेक्षणासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून केवळ शहर स्वच्छ केले. आमच्या गावांतही स्वच्छ सर्वेक्षणाची कामे पोहोचू द्यावीत.  – सुरेश मढवी, ग्रामस्थ, सानपाडा गाव

शहरात स्वच्छतेची काळजी घेतली जात असताना गावांकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामस्थांचे आरोग्य मोलाचे नाही का? बोनसरी, बबनशेठ कॉरी, इंदिरानगरमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. बोनसरीत फिरते शौचालय आहे पण पाण्याचा पत्ताच नाही. त्यामुळे त्याचा वापर होत नाही. गावांचा विकास व स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावे.   – महेश कोठिवले, पदाधिकारी शिवसेना</strong>

Story img Loader