पनवेल सीएसटी या हार्बर मार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणजे सीवुड्स दारावे रेल्वे स्थानक या स्थानकातून दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.याच स्थानकाच्या परिसरात नेक्सस ग्रँड सेंट्रल हा प्रशस्त मॉल आहे. परंतु या रेल्वे स्थानकाची स्थिती नाव मोठे पण लक्षण खोटे अशी झाली आहे. सीवुडस स्थानकात व परिसरात मात्र सुविधांची वानवा पाहायला मिळते. याच रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात पण सुविधांचा येथे तुटवडा आहे. सीवूड स्टेशन परिसरातील व शौचालयातील अस्वच्छता, मोठ्या प्रमाणात पाणी गळती व पाणी जमा होणे, पिण्याचे पाणी, नादुरुस्त विद्युत दिवे व पंखे, पार्किंगबाबत होणारा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.
हेही वाचा- नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्ड्यांवरुन भाजपा आक्रमक; भर पावसात रस्तारोको
प्रवाशांचे हाल
स्थानकातील फलाटावर पाणी गळती पाहायला मिळते तर दुसरीकडे तर स्थानकातील सबवेमध्ये पाणी साचलेले असते. त्यामुळे रेल्वे फलाटावरून सबवे मध्ये जाताना नागरिकांना त्रास होतो. याठिकाणी अनेक महिला,ज्येष्ठ नागरीक यांचा पाय घसरून पडण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. याच रेल्वे स्थानकातून नेरुळ उलवे मार्गावरील परीसरात जाणाऱ्या लोकलगाड्याही धावतात.एकीकडे रेल्वे प्रवासी तर दुसरीकडे नेक्सस मॉल मध्ये जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्याने या स्थानकातील सुविधांकडे रेल्वे व सिडको यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.रेल्वे स्थानकातील समस्यांबाबत वारंवार आवाज उठवला असून सिडको व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती माजी नगरसेवक भरत जाधव यांनी दिली.
हेही वाचा- नवी मुंबईतील पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या कार्यालयावर NIA ची धाड
रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये फेरीवाले
न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकांच्या बाहेर १०० मीटरच्या आतमध्ये फेरीवाले बसण्यास मनाई असताना या नियमाला स्थानकात नियम गुंडाळून ठेवले जातात.त्यामुळे सुरक्षा रक्षक काय करतात असा प्रश्न पडतो. सीवूड्स स्थानकात मॉल परिसर चकाचक तर लाखो प्रवाशी प्रवास करणाऱ्या रेल्वे स्थानकात मात्र सुविधांची वाणवा असल्याची खंत प्रवासी मंगेश काळप यांनी व्यक्त केली. रेल्वे स्थानकातील सुविधांबाबत स्थानकाची पाहणी करण्यात आली असून याबाबत सुधारणा करण्यात येत असल्याची माहिती, सिडकोचे अभियंता मिलिंद रावराणे यांनी दिली.