वन विभाग आणि पालिकेत टोलवाटोलवी; पालिकेने दिलेला एक कोटीचा निधी वापराविना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेखर हंप्रस, नवी मुंबई</strong>

नवी मुंबईतील गवळीदेव डोंगर परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून कायापालट करण्याच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. अद्याप ही योजना कागदावरही उतरलेली नाही. राजकीय घोषणासत्र मात्र अद्याप थांबलेले नाही. प्रशासकीय पातळीवरही वन विभाग आणि नवी मुंबई महापालिकेत टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे वनराईने नटलेल्या गवळीदेव डोंगराचा पर्यटन क्षेत्र म्हणून कधी विकास होणार, याकडे नवी मुंबईकरांचे डोळे लागले आहेत.

नवी मुंबई शहर वसविण्यात आले तेव्हा तिथे एकही पर्यटनस्थळ नव्हते. त्यामुळे घणसोलीनजीक गवळीदेव डोंगराचा पर्यटनक्षेत्र म्हणून विकास करण्याबाबत प्रशासकीय, राजकीय पातळीवर एकमत झाले. हे क्षेत्र वन विभागात असल्याने नवी मुंबई पालिका त्याचा विकास करू शकत नव्हती आणि वन विभागाकडे निधी नसल्याने ते विकास करू शकत नव्हते. पालिकेने निधी पुरवायचा आणि वन विभागाने पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करायचा, असा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला. पालिकेने एक कोटी रुपयांचा निधी दिला, मात्र अद्याप विकास करण्यात आलेला नाही. वन विभागाने एकही छदाम खर्च केलेला नाही. दिलेल्या निधीचा विनियोग कसा केला हे स्पष्ट केल्यानंतरच आणखी निधी पुरवण्यात येईल, असे नवी मुंबई पालिकेचे म्हणणे आहे.

वनराईने संपन्न

गवळीदेव डोंगरावर अनेक जुनी झाडे आहेत. या परिसरात नोसिल कंपनीने हजारो झाडे लावली आहेत. त्यात औषधी झाडांचाही समावेश आहे. त्यामुळे या परिसरात गर्द वनराई, विविध पक्षी, सरडे, विविध कीटक, फुलपाखरे आहेत. इथे पावसाळ्यात माथेरान महाबळेश्वरसारखे वातावरण असते. दोन ते तीन धबधब्यांमुळे नवी मुंबईकर गवळीदेव डोंगराकडे आकर्षित होतात. सध्या मात्र या परिसरात मद्यपी आणि प्रेमी युगुलांचे प्रमाण वाढले आहे.

पांडवकडय़ाचाही विकास रखडला

पांडवकडा येथे नवी मुंबई, पनवेल, मुंबईतून पर्यटक येतात. मात्र कडय़ावर जाण्यास परवानगी नसल्यामुळे पर्यटक अन्य मार्गानी धबधबा गाठतात आणि अपघातांना आमंत्रण देतात. येथे संरक्षक भिंतही उभारण्यात आली आहे. स्थानिक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास लवकरच पांडवकडा परिसर पयर्टनस्थळ म्हणून विकसित करता येईल, असे वनविभागाचे म्हणणे आहे. याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास उद्यान, कपडे बदलण्यासाठी खोली, पक्का रस्ता, रेलिंग, पायऱ्या अशा सुविधा देता येतील, अशी माहिती वन विभागाने दिली. रविवारी मुसळधार पावसात येथे पर्यटकांनी गर्दी केली होती.

तीन वर्षांपूर्वी पालिकेने एक कोटी रुपयांचा निधी दिला होता, त्यानंतरचा निधी हा विकास पाहून देण्यात येणार होता, मात्र निधीचा विनियोग कसा केला या बाबत माहितीच देण्यात आलेली नाही.

– मोहन डगावकर, शहर अभियंता, नमुंमपा

पालिकेने एक कोटी रुपये निधी दिला होता. विकास आराखडा पालिका लोकप्रतिनिधींशी चर्चा करून ठरवणार होती. त्यानुसार विकास होणार होता. आराखडा आमच्यापर्यंत पोहचलेला नाही, त्यामुळे निधी वापरण्यात आलेला नाही. वर्षभरापूर्वी आम्ही या बाबत पाठपुरावा केला होता.

– दिलीप देशमुख, वनक्षेत्रपाल

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of tourism facilities at gavlideo hill
Show comments