नवी मुंबईत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे पोलीस उपनिरीक्षकानेच लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंगीचे औषध देऊन महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार करण्यात आला असून याचे चित्रीकरण करुन पोलीस उपनिरीक्षकाने तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीडी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार याची २०१० मध्ये पीडित पोलीस महिला कर्मचाऱ्याशी ओळख झाली. या दोघांची चांगली मैत्री होती. याचा गैरफायदा अमित शेलारने घेतला. त्याने फळांच्या रसात गुंगीचे औषध टाकून पीडित महिलेवर बलात्कार केला. याचे शेलारने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. २०१६ पासून शेलारने त्या महिला कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तो व्हिडिओ व्हायरल करु, अशी धमकी देत त्याने अनेकदा पीडितेचे शोषण केले. शेवटी या प्रकरणी पीडित महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. संपूर्ण प्रकरणाची सत्यता पडताळल्यानंतर पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी अमित शेलार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात अमित शेलारविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपी अमित शेलारला अटक करण्यात आलेली नाही.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित
पोलीस उपनिरीक्षकावर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असतानाच कळंबोलीतील पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांनी नवी मुंबई पोलिसांची नाचक्की झाली आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. मुंबई पुणे महामार्गावर कळंबोली पोलीस ठाणे अंतर्गत कॅप्टन नावाचे बार आहे. या बार मध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार चालत होते तसेच तिथे वेश्या व्यवसाय देखील सुरु असल्याची तक्रार होती. मात्र, या बारवर कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. या बाबत थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार आल्याने गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी या बारवर कारवाई केली होती. या कारवाईनंतर तीन दिवसांनी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांना निलंबित करण्यात आले.