Panvel GRP constable murder: जीआरपी पोलीस हवालदार विजय चव्हाण (४२) यांची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्या करण्यात आली होती. पनवेल जीआरपीमध्ये कार्यरत असणाऱ्या विजय रमेश चव्हाण यांचा मृतदेह घनसोली आणि रबाळे रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी विजय चव्हाण यांची पत्नी, तिचा प्रियकर आणि आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण (३५) आणि तिचा प्रियकर निंबा ब्राह्मणे (२९) यांनी कट रचून विजय चव्हाण यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी आता ब्राह्मणे, पूजा चव्हाण, प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण (२३) आणि प्रवीण आबा पानपाटील (२१) यांना अटक केली असल्याचे जीआरपी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय चव्हाण यांची हत्या झाल्याचे कळल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी स्वतःहून याबद्दल गुन्हा दाखल केला. तसेच रेल्वे पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांच्या निरीक्षणाखाली तपास सुरू केला. यासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या. पाच दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी खरे मारेकरी शोधले. प्रियकर ब्राह्मणेने रचलेल्या कटानुसार, पानपाटीलने चव्हाण यांना नवीन वर्षाच्या पार्टीसाठी ३१ डिसेंबर रोजी बोलावून घेतले. चव्हाण आल्यानंतर त्या दोघांनी धीरजच्या इको वाहनात एकत्र बसून पार्टी केली. विजय चव्हाण मद्याच्या अमलाखाली गेल्यानंतर ब्राह्मणेने तिथे येऊन रात्री ११.३० च्या सुमारास गळा दाबून त्यांची हत्या केली.

हे वाचा >> भिकाऱ्याच्या प्रेमात बुडाली, सहा मुलांना टाकून महिलेनं ठोकली धूम; पतीकडून गुन्हा दाखल

यानंतर तिघांनी चव्हाण यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅक नजीक नेऊन टाकला. या घटनेनंतर धीरज मात्र भेदरला होता. त्यामुळे ब्राह्मणेने त्याला इको वाहन घरी नेण्यास सांगितले. धीरज आपली गाडी घेऊन घरी गेला. यादरम्यान ब्राह्मणे आणि पानपाटील रेल्वे ट्रॅकशेजारीच तब्बल चार तास थांबले. सकाळी जेव्हा पहिली ट्रेन यायला लागली, तेव्हा त्यांनी चव्हाणचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर ठेवला. लोकल अत्यंत जवळ आल्यानंतर मारेकर्‍यांनी केलेले हे कृत्य मोटरमनच्या निदर्शनास आले. मोटरमनने या घटनेची माहिती आरपीएफ जवान आणि वाशी रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी चव्हाण यांचा मोबाइल कसून तपासला. तेव्हा मोबाइलमधील जीपेवरून शेवटचा व्यवहार घनसोली येथे एका अंडा स्टॉलवर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना हा पहिला पुरावा मिळाला. या स्टॉलच्या नजीक असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर पोलिसांना विजय चव्हाण आणि त्यांच्याबरोबर असलेला धीरज आढळून आला. तसेच चव्हाण यांनी शेवटचा व्हिडीओ कॉल आपल्या मित्राला केला होता, त्यातही धीरज त्यांच्या बरोबर असल्याचे आढळून आले.

पत्नीचे धीरजला वारंवार फोन

याबरोबरच धीरज आणि चव्हाण यांची पत्नी पूजा यांच्यात फोनवरून वारंवार संभाषण झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. यानंतर धीरज राहत असलेल्या द्रोणागिरी येथील इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धीरज रात्री १.३० च्या सुमारास इको वाहन घेऊन आल्याचे दिसले. या सर्व पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी धीरजला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ब्राह्मणे, पूजा आणि पानपाटील यांचा कट उघड केला.

पतीच्या व्यसनाला कंटाळून खून

पोलिसांनी पत्नी पूजा चव्हाणची चौकशी करून हत्येमागचा उद्देशही जाणून घेतला. पत्नीने सांगितले की, चव्हाण यांच्या व्यसनाधीनतेला ती कंटाळली होती. तसेच ते वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडेही जात होते. तसेच जवळीक साधत असताना ते कधी कधी हिंसक होऊन मारहाण करत असाही दावा पत्नीने केला. ही बाब प्रियकर ब्राह्मणेला सांगितल्यानंतर त्यांनी विजय चव्हाण यांना संपविण्याचा घाट घातला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last google pay transaction of panvel grp constable helps police crack his murder kvg