लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबईतील औद्योगिक पट्ट्यातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनावरून भाजपचे नेते गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेत्यांमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे.
शहरात ही योजना राबवली जाताना दहा चटई क्षेत्राचा वापर केला जात असेल तर शहराचे पायाभूत सुविधांचे संपूर्ण नियोजन मोडकळीस येईल, असा मुद्दा उपस्थित करत या योजनेला विरोध असल्याचे नाईक यांनी जाहीर केले. नाईकांच्या भूमिकेनंतर शहरातीर शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले असून गरीब लोकांनी वर्षानुवर्षे झोपड्यांमध्येच राहायचे का, असा सवाल केला आहे.
आणखी वाचा-महापालिकेच्या शाळा रविवारी सुरू? शासनाच्या शाळा दत्तक योजनेविरोधात पालक आक्रमक
नवी मुंबई औद्योगिक पट्ट्यातील जमिनींवरील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेला जात आहे. मध्यंतरी शिवसेनेतील शिंदे गटाच्या नेत्यांनी उपनेते विजय नहाटा यांच्या नेतृत्वाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. या बैठकीत शहरात झोपु योजना राबवली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ऐरोली भागातील काही झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र या सर्वेक्षणाला काही भागांत झालेल्या विरोधामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत गणेश नाईक यांच्यावर टीका केली होती.
नव्याने आरोप-प्रत्यारोप
भाजप नेते गणेश नाईक यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नाईक यांनी झोपु योजनेच्या अंमलबजावणीत दहा चटई क्षेत्राचा वापर केला जाणार असेल तरी ही योजना नवी मुंबईच्या मुळावर येणारी आहे, अशी भूमिका घेतली. इतक्या मोठ्या चटईक्षेत्राचा वापर करून ही योजना राबवली गेली तर शहराला आणखी तीन मोरबे धरणे लागतील, असे म्हणाले. तसेच अशा पद्धतीने योजना राबविण्यास विरोध असल्याची भूमिका मांडली. नवी मुंबईचा कोंडवाडा होता कामा नये, असेही नाईक म्हणाले.
आणखी वाचा-पालिका शाळांच्या स्थितीची न्यायाधीशांकडून पाहणी
झोपडपट्टीतील लोकांचा चांगल्या घरात राहण्याचा हक्क हिरावून घेण्याचा हा प्रकार आहे. लोकसंख्या वाढ, पायाभूत सुविधांवर ताण ही सर्वत्र समस्या आहे. या समस्या केवळ झोपडपट्टी पुनर्विकासाने निर्माण होतात का? याचा अर्थ गरीब लोकांनी वर्षानुवर्षे झोपडीतच राहावे का? -किशोर पाटकर, शिवसेना संपर्कप्रमुख, नवी मुंबई
मला याबाबत माहिती मिळाली. अशा प्रकारे विरोध करणे दुर्दैवी आहे. मात्र लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर भूमिका मांडेन. -विजय चौगुले, शिवसेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष