नवी मुंबई : गेले आठ दिवस राज्यभर पाऊस सुरू असल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला बाजारात भिजलेल्या पालेभाज्यांची आवक होत आहे. या पालेभाज्या एका दिवसात खराब होत असल्याने ग्राहकांकडून मागणी कमी झाली आहे. त्यात आवकही कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. दहा ते २० टक्के दर वाढले आहेत.
एपीएमसीतील भाजीपाला बाजारात दररोज ५५० ते ६०० भाजीपाला गाड्यांची आवक होत असते. ही नियमित आवक कमी होत आता ४२४ गाड्यांवर आली आहे. त्यात पावसामुळे आवक होत असलेल्या भाजीपाला हा भिजलेला येत असून तो बाजारात येईपर्यंतच खराब होत आहे. ग्राहकांनी हा भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्यांना त्याच दिवशी त्याची विक्री करावी लागत आहे. शिल्लक राहिल्यास हा भाजीपाला फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दरात १० ते २० टक्केपर्यंत वाढ करावी लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
घाऊक बाजारात पुणे व नाशिक येथील पालेभाज्या आवक होत असून शुक्रवारी १,३९,००० क्विंटल कोथिंबीर, ३६,५०० क्विंटल मेथी तर ५२, ७०० क्विंटल पालकची आवक झाली.
पालेभाज्या दर
पालेभाजी आधी आता
कोथिंबीर २० ३० ते ३५
मेथी १० १५
पालक १५ २५