उरण : शहरात एकही अधिकृत वाहनतळ नसल्याने वाहनतळाची गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी वाहन चालकांकडून वाहने उभी केली जात आहेत.अशाच प्रकारची शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी पुतळ्या जवळ चारचाकी वाहने उभी करून या रस्त्याचे वाहनतळ बनविले आहे. याकडे नगरपरिषद किंवा वाहतूक विभाग लक्ष देत नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
अवघ्या अडीच ते तीन किलोमीटरच्या परिघात वसलेल्या उरण शहरात ना दुचाकी ना चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ त्यामुळे वाहनचालक मिळेल त्या जागेत आपली वाहने उभी करीत आहेत. शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय काही वर्षांपूर्वी म्हणून सम विषम वाहन तळ,नो पार्किंग आदींचे फलक नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात ठिक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मात्र यामध्ये आश्चर्य म्हणजे नो पार्किंग च्या फलका जवळच मोठया प्रमाणात वाहनांची पार्किंग केली जात आहे. उरण शहरातील कोट नाका,जरी मरी मंदीर, खिडकोळी नाका, पालवी रुग्णालय,गणपती चौक व स्वामी विवेकानंद चौक ही वाहतूक कोंडीची प्रमुख ठिकाणे आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने बेशिस्तपणे उभी केली जात आहेत. त्यांच्यावर वाहतूक विभागाकडून कारवाई होत नाही.तर दुसरीकडे वाहतूक विभागा कडून नेमण्यात आलेल्या वार्डन ला वाहनचालक जुमानत नाहीत. त्यामुळे परिस्थिती जैसे थेच आहे.
हेही वाचा : नवी मुंबईत देवी विसर्जनसोहळा उत्साहात
उरण मोरा मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर गांधी पुतळा असून याच ठिकाणी शहरातील बँका ही आहेत. त्यामुळे आपल्या कामानिमित्त येणाऱ्या वाहन चालकांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबरीने या परिसरता वास्तव्य करणारे नागरिक त्यांची वाहने याच रस्त्यावर उभी करीत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. तसेच पूर्वी या रस्त्यात एक दोन वाहने उभी केली जात होती. त्याठिकाणच्या वाहनात वाढ झाली आहे. याची दखल घेऊन उरण नगरपरिषद व वाहतूक विभागाने आशा वाहनावर कारवाई करण्याची मागणी उरण मधील नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे.