उरण : उरण येथील चिरनेरच्या जंगलातील पुराणाचा खोंड परिसरात बिबट्या असल्याच्या खाणाखुणा आढळून आल्या आहेत. त्यानंतर वन विभागाकडून तपास सुरू केला आहे. यापूर्वी चिरनरेत २०१६ नंतर पुन्हा एकदा बिबट्याचा शोध सुरू आहे. त्यावेळी ती अफवाच ठरली होती. मात्र यावेळी पायाचे ठसे आढळले आहेत. ते बिबट्याचेच असल्याचे निश्चित सांगता येत नसल्याचे मत वन विभागाने व्यक्त केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बिबट्या आला रे आला ची आवई उठल्याने वन विभागा कडून याची दखल घेत सावधानता म्हणून या परिसरातील नागरीकांना व खास करून आदिवासींना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली; कोणतीही जीवित हानी नाही
उरणच्या चिरनेर मध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्यातच हा परिसर आणि कर्नाळा अभयारण्याचा भाग जोडला गेला आहे. त्यामुळे दोन्ही भागातील प्राणी व पक्षी या परिसरात ये जा करीत असतात. दुसरीकडे उरण पनवेल मध्ये नागरीकरण आणि औदयोगिक विकासाच्या नावाने जंगलाची तोड होत आहे. असे असले तरी संरक्षित वन शिल्लक आहे. त्यामुळे येथील जंगलात विविध प्रकारचे प्राणी आहेत. यामध्ये बिबट्याचा ही समावेश आहे. कारण २०११ मध्ये करंजा येथे बिबट्या आढळून आला होता. त्याला ताब्यात घेत असतांना त्याने अनेकांवर हल्ला करून जखमी केले होते. चिरनेर मधील जंगलाचा परिसर आणि त्यामध्ये येणार भाग वन विभागाच्या वन संरक्षका कडून पिंजून काढला जात आहे. त्यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिकांना ही सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
उरणच्या चिरनेर मधील जंगलात बिबट्या असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यानंतर वन विभागाने त्याचा तपास सुरू केला आहे. यासंदर्भात नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचवेळी या परिसरात काही ठसे आढळून आले आहेत. मात्र ते बिबट्याच्या ठशाशी जुळत नाहीत, कदाचित हे ठसे तरसाचे असावेत मात्र चिरनेर परिसरात बिबट्या असण्याची शक्यता नाकारत येत नाही.
-एन.जी.कोकरे, वनसंरक्षक उरण वन विभाग