नवी मुंबई : कुठल्याही पोलीस ठाण्यात गेल्यावर त्या पोलीस ठाण्याचे बहुतांश आवार हे गुन्ह्यातील जप्त वाहने, अपघाती वाहने आणि संशयित वाहनांनी भरून गेलेले असते. मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अशा वाहनांसाठी वेगळी जागा करण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस ठाणे आवार सुटसुटीत झाले आहेत. या जागेचा कल्पक उपयोग सीबीडी पोलीस ठाण्याने केला असून काही महिन्यांपूर्वी बॅडमिंटन कोर्ट उभे केले. तर आता पोलिसांसाठी अभ्यासिका निर्माण करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते पार पडले.
नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनी गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल व वाहने हे आयुक्त स्तरावर केंद्रित केल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यामधील बरीच जागा रिकामी झाली. तसेच मुद्देमाल ठेवलेल्या काही खोल्याही रिकाम्या झाल्या होत्या. सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सदर जागेचा उपयोग आपले सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बॅडमिंटन कोर्ट, ओपन जिम असे उपक्रम सुरू करण्यासाठई केला होता.. त्यानंतर त्यांनी मुद्देमाल ठेवलेल्या खोलीचे रूपांतर पोलीस कर्मचारी व पाल्य यांच्याकरिता अतिशय उत्कृष्ट अशा अभ्यासिकेमध्ये केले आहे.
हेही वाचा >>>उरण : गणेशोत्सव संपताच मासळी खरेदीसाठी गर्दी
सदर अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, कायद्याच्या पुस्तकांसह आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या अशी एकूण ३०० ते ३५० पुस्तके ठेवण्यात आली आहेत. त्यात आता हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. यात कायद्याशी संलग्न पुस्तकांचा जास्त समावेश असला, तरी सामान्यज्ञानात भर घालणारी, मनोरंजन, कथा, कादंबरी, प्रेरणा देणाऱ्या वक्त्यांची पुस्तके तसेच ललित साहित्याचीही भर पडणार आहे. ज्यामुळे कायम मानसिक दबावाखाली असणाऱ्या पोलिसांच्या मानसिकतेत सकारात्मकता निर्माण होऊ शकेल.
वरिष्ठ पोलीस गिरीधर गोरे यांनी वर्षभरात पोलीस ठाण्याचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला असून महाराष्ट्रामध्ये प्रथमच पोलीस ठाण्यात अभ्यासिका सुरू करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. असेच उपक्रम इतर पोलीस ठाण्यांनीही राबवावेत, असे मत आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केले आहे.