नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शहरातील नव्या मालमत्तांचा शोध घेणे, जुन्या मालमत्तांचा आकार ठरवणे तसेच रहिवासी आणि वाणिज्य मालमत्तांचे योग्य प्रकारे वर्गीकरण करणे अशा काही कामांसाठी सुरू करण्यात आलेले बहुचर्चित लिडार सर्वेक्षण अपूर्णच राहिले आहे.
हे सर्वेक्षण पूर्ण झाले तर मालमत्ता करापोटी महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला किमान एक हजार कोटी रुपये उभे राहतील असा दावा तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडताना केला होता. प्रत्यक्षात अजूनही शहरातील मालमत्तांचे ७५ टक्के सर्वेक्षणाचे लक्ष्यही पूर्ण करता आलेले नाही.
मे. सेन्सस टेक लि. कंपनीकडून तीन लाख नऊ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करून मालमत्ता विभागाकडे सुपूर्द केले होते. पालिकेच्या मालमत्ता विभागानेही सर्वेक्षण करण्यात आलेल्या मालमत्तांची पुनर्पडताळणी प्रत्यक्ष मालमत्तेच्या ठिकाणी जाऊन केली का, असा प्रश्न आहे. लिडार सर्वेक्षण कामाची मुदत नोव्हेंबर २०२२ पर्यंत होती.
हेही वाचा >>>Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
लिडार सर्वेक्षणानुसार पाठवलेल्या बिलांमध्ये चुकीची नोंद झाल्याचा दावा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला होता. त्यामुळे सर्वेक्षण वादातच अडकले आहे. १९९२ साली पालिका अस्तित्वात आल्यापासून शहरात मालमत्तांची प्रचंड वाढ झाली, परंतु त्या पटीत मालमत्ता करवसुली वाढली नाही. मालमत्तांचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात आले. सिडकोने बांधलेल्या बैठ्या घरांचे रूपांतर तीन ते पाच मजली इमारतीत झाले आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या रहिवाशी इमारतीत विनापरवाना वाणिज्य वापर सुरू आहे. महापालिकेच्या अभिलेखाप्रमाणे शहरात सुमारे ३.४६ लाखांपेक्षा अधिक मालमत्ता आहेत. सर्वेक्षण पूर्ण झाल्यास त्यात वाढ होईल.
नवी मुंबई महापालिकेचे लीडर सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात फक्त मालमत्तांचे सर्वेक्षण नसून इतरही अनेक कामे आहेत. ती कामे पूर्ण करून घेण्यात येत आहेत. मालमत्ता सर्वेक्षणाची कामेही पूर्णपणे करून घेण्यात येणार आहेत. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका