नवी मुंबई: देशातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक म्हणून  शीव  पनवेल महामार्गाचे नाव घेतले जाते. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तसेच गोवा राज्याला जोडणाऱ्या महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडले आहेत. सर्वाधिक खड्डे बेलापूर उड्डाणपुलावर पडल्याने पनवेल कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांनी बेलापूर पासून पुढे  पामबीच मार्गाचा वापर करावा असे आवाहन नवी मुंबई वाहतूक शाखेने केले आहे. येथील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले आहेत.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शीव  पनवेल मार्गावरील बेलापूर येथील उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडलेले असून मुंबई कडे जाणाऱ्या मार्ग तर धोकादायक बनला आहे. पाऊण फुटापर्यंत खड्डे पडलेले असून संततधार पावसाचे पाणी त्यात साचल्याने  खड्डा किती खोल आहे? याचा अंदाज वाहन चालकांना येत नाही. परिणामी खड्ड्यात गाडी आदळली जाते. येथे पडलेल्या प्रचंड खड्ड्यामुळे खारघर पर्यंत अर्थात तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा सकाळच्या  लागत आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येणारे वाहने पहाटे चार नंतर हजारॊच्या संख्येने  प्रवासी आणि मालवाहू वाहने येत असतात. अशात बेलापूर उड्डाणपुलावरील खड्डयामुळे  वाहनांचा वेग अत्यंत मंदावतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. 

आणखी वाचा-पनवेल: सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरात शिरून सिने स्टाईलने ३४ लाख लुटले

या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग वारंवार खड्डे भरत आहे मात्र पावसाची थोडीही उघडीप नसल्याने हा उपाय तात्पुरता  ठरत आहे. सहा  सात जरी पावसाने उघडीप दिली तर व्यवस्थित खड्डे  बुजवले जाऊ शकतात. असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. 

या ठिकाणी भर पावसात आज (मंगळवारी) सकाळी स्वतः वाहतूक शाखेचे पोलीस उपयुक्त तिरुपती काकडे हे वाहतूक नियंत्रित करताना दिसत होते. यावेळी त्यांना विचारणा केली असता उड्डाणपुलावरील खड्ड्यामुळे वाहतूक अत्यंत धिम्या  गतिने होते. त्यामुळे हलक्या वाहनांनी बेलापूर नंतर पामबीचचा वापर करावा असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Light vehicles should use the alternate route palm beach potholes on shiv panvel road mrj