नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबईचा अग्रक्रमांक असावा यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा झगमगाट केला जात असून रस्त्यांच्या कडेला तसेच दुभाजकांवर असलेल्या वृक्षांवरही रोषणाईचा हा फास आवळला जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाने या रोषणाईसाठी खास निविदा मागविल्या आहेत.
केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ शहर अभियानात राज्यातील पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून अनेकदा नवी मुंबई नावाजले गेले आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी देशात नवी मुंबईचा पहिला क्रमांक यावा यासाठी मोठ्या प्रमाणावर वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला. शहरातील कानाकोपरा रंगविण्यात आला. शिवाय फ्लेंमिगोचे शहर अशी नवी ओळखही याच काळात नवी मुंबईला मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. नवी मुंबईची ही रंगरंगोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भलतीच पसंत पडली. त्यामुळे ठाण्यात शंभराहून अधिक कोटी रुपयांचा खर्च करून संपूर्ण शहर रंगविण्यात आले. शिवाय जागोजागी रोषणाई, झगमगाटाचा प्रयत्नही करण्यात आला. झगमगाटाचा हाच पॅटर्न सध्या राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये लागू केला जात असून नवी मुंबई महापालिकेने नुकत्याच यासंबंधीच्या निविदा काढून रोषणाईवर तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे बहुसंख्य ठिकाणी वृक्षांच्या फांद्यांवर, दुभाजकातील झाडांवर ही रोषणाई केली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
रोषणाईमुळे झाडांच्या वाढीवर परिणाम होतो. अनेकदा तारांमध्ये बिघाड होऊन वृक्षांना आगी लागतात. वृक्षांवर लहान-मोठे किटक असतात. त्यांच्या प्रजनन संस्थेवर परिणाम होतो. ठाणे जिल्ह्यात स्थलांतरीत पक्षी येत असतात. या पक्ष्यांना रोषणाईमुळे दिवस आणि रात्रीचा फरक कळत नाही. या पक्ष्यांच्या दिशा चुकतात. दिल्ली उच्च न्यायालय तसेच राष्ट्रीय हरित लवादाने वृक्षांवर रोषणाई करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. – रोहित जोशी, पर्यावरण कार्यकर्ते, ठाणे
हेही वाचा – उरणच्या एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती, रात्रीच वाहिनी दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा सुरळीत
स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत विद्युत रोषणाई केली जाते. स्वच्छ सर्वेक्षण तपासणीसाठी पथक शहरात येणार असल्याने प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी महामार्गावर हे काम करण्यात आले होते. – शिरीष आरदवाड, सहशहर अभियंता