खारघरमधील ‘लिटिल वर्ल्ड मॉल’मधील कार्यक्रमात ७९२ तासांचा चीनचा विक्रम मोडीत

अखंड गायनाच्या नव्या जागतिक विक्रमाकडे खारघरमधील लिटिल वर्ल्ड मॉलमध्ये वाटचाल सुरू आहे. बुधवारी चीनचा ७९२ तासांचा विक्रम मोडीत काढण्यात आला. ‘विराग मधुमालती’ सांगीतिक चमूने हा प्रयत्न सुरू केला आहे.

दुपारी एक वाजून २१ मिनिटे आणि दोन सेकंदाने विराग व त्याच्या संगीत चमूने सतत गायनाच्या विक्रमात नवी नोंद केली. ‘गिनीस बुक वर्ल्ड रेकॉर्ड’च्या वतीने या घटनेची नोंद घेतली. हे परीक्षक मंडळ २२ डिसेंबर रोजी खारघरमध्ये दाखल होणार आहे. हिंदी आणि मराठी गीतांवर ही गाणी गायली जात आहेत.  या माध्यमातून अवयवदान आणि सुरक्षित दुचाकीस्वारी, जागतिक तापमानवाढ, जलसंवर्धन, वृक्ष वाचवा आणि मुलगी वाचवा असे सामाजिक संदेश दिले जात आहेत.

मूळ अमरावती येथील स्थापत्य अभियंत्याचे शिक्षण घेततेल्या विराग वानखेडेने त्याच्या छंदामुळे संगीत व कला हेच माध्यम भविष्यासाठी निवडले. विराग यांनी संगीताचे शिक्षण घेतले असून त्यांनी आतापर्यंत चार विश्वविक्रम नोंदवले आहेत. आजवर ८०० तास सतत गायन करण्याचे उद्दिष्ट विरागच्या चमूने पूर्ण केले आहे. विराग याच्यासह अनेक गायकांना शुभेच्छा देण्यासाठी अलका कुबल, भारत गणेशपुरे, नंदेश उमप, पूजा जैसवाल आदी सिनेक्षेत्रातील व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.

फक्त गोड गळा हवा!

आतापर्यंत ९ हजार ५०० हून अधिक गीते ८०० गायकांनी मिळून गायली आहेत. सर्व गायकांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध आहे. यासाठी प्रत्येक गायकाला सुरुवातीला आवाजाचे परीक्षण दिल्यानंतर व्यासपीठावर गाता येईल.  विरागच्या या सामूहिक गायनाला नवी मुंबई, लातूर, अमरावती, मुंबई, पुणे, पनवेल व राज्यभरातील विविध जिल्ह्य़ांतून येणाऱ्या गायकांची साथ मिळत आहे.

Story img Loader