पनवेल : पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी पनवेलमध्ये जोरदार सुरू आहे. आतापर्यंत आठ हजार ३९६ पथविक्रेत्यांना १० कोटी ५० लाख ४० हजार रुपयांचे कर्ज विविध बँकेतून वितरित झाल्याची माहिती सोमवारी पालिकेत झालेल्या बैठकीत समोर आली.
पनवेल महापालिका प्रशासन आणि विविध बँकेचे प्रतिनिधी यांच्यात ही बैठक पार पडली. या वेळी आतापर्यंत १० हजार रुपयांचे कर्ज ६७११ तसेच २० हजार रुपयांचे कर्ज १५४४ आणि ५० हजार रुपयांचे कर्ज १४१ पथविक्रेत्यांनी घेतल्याचे समोर आले. मात्र अजूनही ११,०५३ फेरीवाल्यांनी बँकांकडे ऑनलाइन कर्ज मिळण्यासाठी अर्ज केले असून त्या अर्जदारांना लवकर कर्जपुरवठा करा अशी सूचना सोमवारी बैठकीत पालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केली. या बैठकीमध्ये विविध बँकांचे प्रतिनिधी, पालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात, विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा – तंत्रज्ञानामुळे नातेसंबंधात दुरावा; कवी अशोक नायगावकर यांची खंत
हेही वाचा – नवी मुंबई : बेकायदा बांधकामांच्या दंडरकमेचे धनादेशही ‘बोगस’
महापालिका क्षेत्रात ७८०० पथविक्रेत्यांची नोंदणी झाली आहे. पथविक्रेत्यांना खेळते भांडवल राहावे यासाठी ही योजना लाभदायी आहे. स्वनिधी योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचे पहिले कर्ज वेळेत किंवा वेळेच्या आधी फेडल्यास याच योजनेतून पथविक्रेत्यांना दुसरे कर्ज २० हजार रुपयांचे दिले जाते. त्यानंतर ५० हजार रुपये कर्ज उपलब्ध होते. महापालिका कार्यक्षेत्रातील विविध बँकांनी महापालिकेला पंतप्रधान स्वनिधी योजना राबविण्यास उत्तम सहकार्य केल्याबद्दल बैठकीमध्ये पालिकेचे उपायुक्त डॉ. विधाते यांनी बँकांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले.